एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्‍टोबर महिन्याचे वेतनही दिवाळीपूर्वी एसटीकडून ST कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. त्यासोबतच महागाई भत्ता आणि दिवाळी अग्रिमची कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे; मात्र गेल्या दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन अद्याप मिळाले नसल्याने, राज्यातील एक लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा दसरा अंधारात जाणार आहे. दरम्यान 2 नोव्हेंबर रोजी राज्यपातळीवर प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन दिले जाणार आहे; तर 9 नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबासह आक्रोश आंदोलन करणार आहे. 

Must Read 

कोरोना Corona महामारीत एसटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर प्रवासी सेवेचे काम केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारच्या आदेशानुसार परराज्यातील मजुरांना थेट त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची कामगिरी केली; तर अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरात प्रवासी सुविधा देत, सध्या मुंबईच्या बेस्ट उपक्रमात सहभागी होऊन बस प्रवाशांची वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत; मात्र अद्याप कर्मचाऱ्यांना नियमित वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आहे. घरखर्च चालवणे कठीण झाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने जुलैचे वेतन ऑक्‍टोबरमध्ये दिले असले, तरी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे वेतन कामगारांना अद्याप मिळालेले नाही. त्यासोबतच ऑक्‍टोबर महिन्याचे वेतनही 7 ऑक्‍टोबर रोजी नियमित वेळेवर मिळणे अपेक्षित आहे. 

महागाई भत्त्यापासून वंचित 
सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव पाच टक्के महागाई भत्ता याच वर्षी जानेवारी महिन्याच्या वेतनापासून लागू केला आहे; परंतु एसटी कामगारांना अद्याप यासंदर्भातील लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे हा महागाई भत्ता ऑक्‍टोबर महिन्याच्या वेतनात लागू करण्यात यावा. त्यासोबतच गेल्या दोन वर्षांतील महागाई भत्त्याची थकबाकीदेखील कामगारांना देण्याची मागणी राज्य एसटी कामगार संघटनेने केली आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या 

  • तीन महिन्यांचे प्रलंबित वेतन 
  • करारातील तरतुदीप्रमाणे राज्य सरकारला लागू केल्याप्रमाणे महागाई भत्ता 
  • सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे व करारातील तरतुदीप्रमाणे दिवाळी सण अग्रिम 
  • मागणीप्रमाणे दिवाळी भेट 

74 जणांचा बळी 
राज्यात 23 ऑक्‍टोबरपर्यंत एकूण 2,202 एसटी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. त्यापैकी 1,727 कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत. 401 कर्मचाऱ्यांचा अद्याप उपचार सुरू आहे; तर 74 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी चार मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाचे सानुग्रह सहाय्याची मदत करण्यास आली आहे; तर इतर सर्व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने माहिती दिली आहे.