start-trimikus-road-foul-smelling-water-

 शहरात स्टेशन परिसरातील रस्त्यावर गटारीचे पाणी वाहत असताना या दुर्गंधीयुक्त पाण्यातच मिरजेच्या कारभाऱ्यांनी ट्रिमीक्‍स (Trimix) रस्त्याच्या कामाचा प्रारंभ उरकला. त्यावेळी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना घेराव घालून जाब विचारला. गाऱ्हाणे मांडले. 

कोट्यवधी रुपये खर्चुन करण्यात येणाऱ्या काही कामांच्या प्रारंभासह काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या कामांच्या लोकार्पणासाठी मिरजेच्या कारभाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakantada Patil) यांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमांसाठी लाखोंचा खर्च कारभाऱ्यांनी केला. 

Must Read 

त्यापैकी आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात श्री. पाटील यांनी कारभाऱ्यांना यापुढे रस्ते गटारींची कामे करण्याऐवजी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा सल्ला प्रमुख पाहुणे म्हणून दिला. परंतु मिरज रेल्वे स्थानक परिसरात याच गटारीच्या कामांची किती उपयुक्तता आहे हे नागरिकांनी घेराव घातल्यानंतर त्यांना समजले. रस्त्यावरून सांडपाण्याचे लोट वाहत असल्याने दुर्गंधी आणि घाणीमुळे परिसराचा नरक बनलेला होता. त्याच ठिकाणी ट्रिमीक्‍स पद्धतीने रस्ता करण्याचा घाट कारभाऱ्यांनी घातला आहे. त्यालाच आक्षेप घेत नागरिकांनी रस्त्यावरून वाहणारे पाणी पहिल्यांदा बंद करा, लोकांच्या जीवाशी खेळू नका, असे श्री. पाटील यांना बजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 

कारभारी, कार्यकर्त्यांची मात्र त्यावेळी भंबेरी उडाली. नेहमीप्रमाणे सारवासारव करीत चंद्रकांत पाटील यांनी लोकांच्या संतप्त भावना ऐकून घेतल्या व सुटका करून घेतली. त्यानंतरच्या एका कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी स्थानिक कारभाऱ्यांची कानउघडणी करून हजेरी घेतली. तातडीने रस्त्यावरून वाहणारे गटारीचे पाणी बंद करा, असेही बजावून सांगितले. एकूण या प्रकारामुळे महापालिकेतील कारभारी, प्रशासनाची भंबेरी उडाली.