वाद झाल्याने पालकांवर रुसून मित्राला भेटायला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार  Gang rape केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उशिरा उघडकीस आला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात ‘पॉस्को’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना गुरूवारी रात्री ताब्यात घेण्यात आले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. 

पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी मंगळवारी हडपसर ठाण्यात दिली होती. अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी शोध सुरू केला असता ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चार मित्रांनी माझ्यावर बलात्कार केल्याचे  सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुलीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले व आरोपींचा कसून शोध सुरु केला. गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. 

फोन करून मित्रांना बोलावले
मुलगी मित्राकडे जात असताना रस्त्यात एक आरोपी तिला भेटला. त्याने मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून तुला मित्राकडे सोडतो, असे सांगितले. यानंतर तिला एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अशाप्रकारे इतर आणखी दोन मित्रांनी येऊन तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.