Main Featured

तरूणांनो सावधान! कोल्हापुरात 2200 रुपयांत "फिल्ड ऑफिसर'ची नियुक्ती पत्रे


 

fraud-appointment-letters-field-officecrime update : अबकारी विभागा (Excise Departmentत रोजगार योजनेत "फिल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर' म्हणून नोकरीचे अमिष दाखविले जात आहे. अर्ज नोंदणीसाठी दोन हजार दोनशे रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले जात आहेत. नोकरीत वीस हजार रुपये पगारासह इतर भत्ते देण्याचेही अमिष दाखविले आहे. कोल्हापुरातील अनेक तरुणांना अशी पत्रे आली आहेत. याबाबत आम्ही सायबर सेलसह उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली तेंव्हा ही पत्रे बनावट (फेक) असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Advertise

चार ओळींची जाहिरात करून त्यामध्ये संपर्क क्रमांक दिला जातो. त्यावर संपर्क साधल्यास तुमची माहिती घेवून घरी नियुक्ती पत्र येते. त्यामध्ये तुमचे नाव आणि अर्ज क्रमांक असतो. संपूर्ण मजकूर हिंदीमध्ये असतो. भारत सरकारच्या अबकारी विभाग रोजगार योजनेत "फिल्ड वितरण अधिकारी' म्हणून नियुक्त केले असल्याचा उल्लेख असतो. तसेच तुम्हाला वीस हजार रुपये पगार, पेट्रोल, वाहन देखभाल दुरुस्ती खर्च, दुपारचे जेवन याच बरोबर पीएफ, वैद्यकीय खर्च, विमा अशा सुविधाही मिळणार असल्याचे सांगितले जाते. तसेच अर्ज नोंदणी खर्च म्हणून 2 हजार 200 रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले जाते. तसेच कंसामध्ये ही रक्कम परत मिळणार असल्याचेही म्हटले असते. 

प्रत्यक्षात आम्ही याबाबतची माहिती घेतली. तेंव्हा हे पत्रच बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. मुळातच पत्रावर "मिनिस्ट्री ऑफ एक्‍साईज्‌ इंडियन गव्हर्मेंट' असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात देशात अशी कोणतीही "मिनिस्टरी' नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. तसेच शिक्का गोल असतो तेथे लांब आहे. संचालक म्हणून ही "गुप्ता' नावाचा उल्लेख आहे, असे कोणीही अधिकारी नसल्याचेही सुत्रांनी सांगितले. त्यामुळे अशा कोणत्याही अर्जाची, पत्राची दखल तरुणांनी घेवू नये, पैशांचे व्यवहार करू नयेत. त्यांनी दिलेल्या लिंकवर क्‍लीक करून आपली सर्व माहिती देवू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 
 
"अथोराईज्ड्‌' असा ही शिक्का त्या नियुक्त पत्रावर आहे. सरकारी कार्यालयातील कोणत्याही पत्रावर असा शिक्का नसतो. तसेच शासकीय कार्यालयातील नियुक्ती ही मुलाखती शिवाय होत नाही. तेथे पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे अशी पत्रे बनावट असतात. तरुणांनी त्याची दखल घेवू नये. 
-संजय मोरे, पोलिस निरीक्षक. सायबर पोलिस ठाणे 
 
कोल्हापुरातील एका तरुणाला असे पत्र आले आहे. त्यालाही ते बनावट असल्याचे जाणवले. त्यामुळे पत्रावर असलेल्या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधला असता लिंक येईल, त्या लिंकवर क्‍लीक करून पैसे पाठवा असे सांगितले. मात्र तरुणाने ती लिंक क्‍लिक केलेली नाही. प्रत्यक्षात या लिंकवर क्‍लीक केल्यास आपल्याकडील सर्व माहिती त्यांना जाऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्‍लीक करून आपली फसवणूक करून घेवू नका असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. 

 
तुमच्या घरी येवून अधिकारी अधिक माहिती घेतील. नोंदणीची संपूर्ण कागदपत्रे घेतील. पैसे भरल्यानंतर पुढील चोविस तासांत ही प्रक्रीया पूर्ण केली जाईल, असेही पत्रावर असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितले. मात्र पैसे तातडीने भरा असेही सांगितले. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर हा अर्ज तुमच्या भागातील अबकारी विभागात जमा करण्याचाही सल्ला दिला आहे.