Main Featured

यंदाचा नवरात्रोत्सव नियमांनुसारच : अंबाबाई मंदिरात भाविकांना प्रवेश नाहीच


 

do-not-entry-ambabai-temple

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव शासनाने जाहीर केलेल्या नियमांनुसारच होणार आहे. केवळ मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतील. भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती आज पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती (Maharashtra Devasthan Samitiचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समितीच्या मुख्य कार्यालयात पूर्वतयारीसाठी विविध बैठका झाल्या. पोलिस प्रशासन, महावितरण, महापालिका मालमत्ता विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार विभाग, श्रीपूजक, सेवेकरी, सुरक्षा पुरविणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. जाधव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मंदिरातील वीज, पाणीपुरवठा असेल किंवा मंदिर परिसरातील खड्डे बुजविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.’’   

Advertise

देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक निरीक्षक वसंत बाबर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संकपाळ, समितीच्या उपसचिव शीतल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी आदी उपस्थित होते. दरम्यान, उद्या (ता. ८) श्री छत्रपती देवस्थान ट्रस्ट आणि टाकाळा व शाहू मिल परिसरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका होणार आहेत. 

चारही दरवाजांची स्वच्छता

अंबाबाई मंदिरात सोमवारपासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला आहे. देवस्थान समितीचे कर्मचारीच यंदा मोहीम राबवत आहेत. शिखरांवरील सर्व स्वच्छता पूर्ण झाली असून, आज मंदिराच्या चारही दरवाजांची स्वच्छता झाली. सोमवारी (ता. १२) गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले.