Main Featured

टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी


 
crime report : 
‘पैसा फेको तमाशा देखो...’ याप्रमाणे प्रेक्षकांना पैसे देऊन टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. यात, रिपब्लिक टीव्ही (Republic TV) या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ हे तीन चॅनल सहभागी असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी दोन चॅनलच्या मालकांना अटक केली असून, कारवाईचा मोर्चा रिपब्लिक टीव्हीकडे वळवला आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी ही माहिती दिली.


‘भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (‘India Broadcast Audience Research Council’)’ ही संस्था भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली काम करते. ३२ हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली ही संस्था भारतीय टीव्हीवरील जाहिरात उद्योगाला सखोल माहिती पुरवते. या संस्थेने संपूर्ण भारतात मूल्यमापनासाठी ३० हजार बॅरोमीटर बसवले आहे. त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या कार्यक्रमावर लक्ष ठेवून, विविध चॅनेल्सला रेटिंग दिले जाते. मुंबईत असे २ हजार बॅरोमीटर आहेत. 

Advertise

याच बॅरोमीटरची जबाबदारी हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. अशाप्रकारे टीआरपीमध्ये फेरफार होत असल्याची तक्रार हंसाकडून करण्यात आली. त्यानुसार सीआययूचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अधिक तपास सुरू केला. तपासात कंपनीचा माजी कर्मचारी त्यांच्या हाती लागला. त्याने कंपनीने विश्वासाने सोपविलेल्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याचे आढळून आले. विविध टीव्ही चॅनेल्सना या बॅरोमीटरच्या माहितीची विक्री केली. 

याच माहितीच्या आधारे विविध चॅनेल्सने प्रेक्षकांना पैसे देऊन टीआरपी वाढविण्याचा घाट घातला व त्यातून जाहिरातदार मिळविले. आरोपीच्या खात्यातून २० लाख आणि लॉकरमधून साडेआठ लाख रुपये जप्त केले. कांदिवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात अला. याप्रकरणी हंसाचा विशाल वेद भंडारी (२१), नारायण नंदकिशोर शर्मा ( ४७) आणि अंधेरीतील पी. एन. मेस्त्री (४४), शिरीष सतीश पट्टनशेट्टी (४४) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, रिपब्लिकन वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी या आरोपांचे टिष्ट्वटरवरून खंडण केले असून मुंबई पोलिसांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

‘हंसा’च्या कर्मचाऱ्यांचा समावेश


हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांसह सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाºयांच्या संगनमताने हे रॅकेट सुरु असल्याचा संशय पथकाला आहे. त्यानुसार सर्वांकडे चौकशी सुरू आहे.

कोटींचे नुकसान


बनावट टीआरपीमुळे बीएआरसीसह जाहिरातदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाद्वारे सुरू असलेली बदनामी, त्याचप्रमाणे अशा बनावट टीआरपीद्वारेही काहींनी चुकीची माहिती व्हायरल केल्याचे दिसून आले. अशाप्रकारे अन्य वृत्तसंस्था व चॅनलबाबतही अधिक तपास सुरू आहे. - परमबीर सिंह,

पोलीस आयुक्त, मुंबई


चौकशीदरम्यान रिपब्लिक वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ हे चॅनल्स यात सहभागी असल्याचे समोर आले. त्यानुसार, फक्त मराठीच्या शिरीष पट्टनशेट्टी आणि सिनेमा बॉक्सचे मालक नारायण नंदकिशोर शर्मा यांना सीआययूने अटक केली. रिपब्लिकच्या प्रमुखासह कर्मचारी, संचालक तसेच यात सहभागी सर्वांवर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलीस आयुक्त सिंह यांनी सांगितले.

‘रिपब्लिक’चे नाव असे आले समोर


बीएआरसीच्या निरीक्षणात रिपब्लिकचे नाव समोर आले. त्यांनीही पैसे देऊन टीआरपी मिळविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे रिपब्लिकच्या अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे समजते.


टीआरपी म्हणजे काय, कसा ठरवतात?


बीएआरसी एका सेट टॉप बॉक्स (Set top boxसारख्या यंत्राच्या मदतीने टीआरपीसंदर्भातील डाटा गोळा करते. वापरकर्ते कोणत्या वाहिन्या पाहतात, याची नोंद या यंत्राच्या माध्यमातून ठेवली जाते. याच आकडेवारीच्या आधारे टीआरपी निश्चित केला जातो. कोणत्या वाहिन्या सर्वाधिक काळासाठी पाहिल्या जातात, याची आकडेवारी गोळा करून त्याच्या सरासरीच्या आधारे टीआरपी ठरवला जातो.


मिळवला टीआरपी


प्रेक्षकांना ४०० ते ५०० रुपये देऊन दिवसभर चॅनल्ससमोर बसविण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने ज्या घरांमध्ये बॅरोमीटर बसवले आहेत, तेथील लोकांना वेळोवेळी पैसे देऊन ठरावीक टीव्ही चॅनल्स पाहण्यास उद्युक्त केले. विशेष म्हणजे, झोपडपट्टीमध्ये इंग्रजी येत नसलेल्या घरातही इंग्रजी चॅनल्स सुरू ठेवण्यात येत होते.