गडहिंग्लज उपविभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी आज येथील कार्यालयात पदभार स्विकारला. मावळते अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचबरोबर इचलकरंजी येथील पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी येथील पदभार सोडला.

अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून श्रीनिवास घाडगे यांनी दोन वर्षापूर्वी गडहिंग्लज उपविभागाचा पदभार स्विकारला होता. कोल्हापूर येथे रुजू झाल्यापासून त्यांनी गुन्हेगारीची पाळेमूळे खणून काढत गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. त्यांच्या कारकिर्दीत शहरातील तब्बल 16 गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कालावधी पूर्ण झाल्याने घाडगे यांनी नुकतीच बदली करण्यात आली आहे. 

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

त्यांच्या जागी मुंबईतील गुन्हे आर्थिक शाखेत कार्यरत जयश्री गायकवाड यांची गडहिंग्लज उपविभाग अप्पर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आज गायकवाड यांनी इचलकरंजीत येऊन आपल्या पदाचा पदभार स्विकारला.  यावेळी मावळते अप्पर पोलिस अधिक्षक घाडगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.दरम्यान, पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांची पिंपरी चिंचवड येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. श्री. बिरादार यांनी बुधवारी बदलीच्या ठिकाणी हजर होऊन पदभार स्विकारला. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही निवड झालेली नाही.

श्री. घाडगे व श्री. बिरादार यांनी शहर व परिसरातील गुन्हेगारीला चांगलाच चाप लावला आहे. सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर वचक निर्माण करत शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात त्यांनी यश मिळविले. ते कायम ठेवण्याचे आव्हान नुतन अधिकार्‍यांसमोर असणार आहे.