Team-india

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)याचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन ब्रॅण्ड या संस्थेने खेळांमधील सर्वांत आदरणीय व्यक्ती म्हणून सन्मान केला आहे. TIARA रिसर्च रिपोर्टमध्ये धोनी हा सन्मानित खेळाडू असल्याचं सांगण्यात आलं आहे. धोनी हा सध्या आयपीएल (IPL 2020)मध्ये चेन्नई (CSK)चं नेतृत्व करत आहे. यंदाच्या मोसमात चेन्नईला चांगली कामगिरी करता आली नसली, तरी त्याने याआधी प्रत्येकवेळा चेन्नईला आयपीएलच्या प्ले-ऑफपर्यंत पोहोचवलं आहे. यंदाच्या वर्षी मात्र चेन्नई ही प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडलेली पहिली टीम ठरली.

भारतीय क्रिकेटसाठीही धोनीचं योगदान मोठं आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 साली 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला. 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी भारत जिंकला तेव्हाही धोनीच कर्णधार होता. एवढच नाही तर धोनी कर्णधार असतानाच भारत टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. आयसीसीच्या सगळ्या ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

Must Read 

मैदानात असो किंवा मैदानाबाहेर धोनी हा कायम शांत असतो, अशी त्याची ख्याती आहे. त्यामुळे त्याला कॅप्टन कूल असंही म्हणतात. यामुळेच त्याला सर्वांत आदरणीय ठरवण्यात आलं आहे.

धोनीबरोबरच भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये हार्दिक पांड्याची सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटी म्हणून निवड करण्यात आली आहे. कॉफी विथ करण या टीव्हीवरील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर बंदीदेखील घालण्यात आली होती.

त्याचबरोबर कोहलीने या यादीमध्ये टीव्हीवरील वादग्रस्त सेलिब्रिटींमध्ये पहिले स्थान पटकावलं आहे. या यादीमध्ये करण जोहर याचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर सर्वांत आकर्षक व्यक्तींमध्ये देखील कोहलीने सर्वात पहिले स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सर्वांत आकर्षक जोडप्याचा टॅग देखील मिळवला आहे.

दरम्यान, सध्या विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या दोघांच्याही टीम आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी बँगलोरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला विराट कोहली अपयशी ठरत होता, पण त्यालाही आता सूर गवसला आहे. सोबतच बँगलोरची टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यात जमा आहे.

तर दुसरीकडे हार्दिक पांड्या खेळत असलेल्या मुंबईने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याचा पराभव झाल्यामुळे मुंबईचा प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी बँगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात क्रिस मॉरिससोबत मैदानातच बाचाबाची केल्यामुळे हार्दिक आणि मॉरिस या दोघांनाही मॅच रेफ्रीने समज दिली होती.