Rautancha-Tola

politics
शिवसेना विरुद्ध राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Bhagat Singh Kosari या संघर्षानं पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वीच डोकं वर काढलं. ज्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप आणि राजकीय टोलेबाजीनं जोक धरला. त्यातच आता शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या दैनिकातून खासदार संजय राऊत यांनी सणसणीत टोला लगावला आहे. राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर केला जात असल्याचं त्यांनी रोखठोक या सदरात म्हटलं आहे. 

Advertise

विरोधी पक्षाचं सरकार असणाऱ्या राज्यात राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर करत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राज्यातील सरकार अस्थिर करायचं, असा सणसणीत टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. असं म्हणत असताना त्यांनी अशा काही राज्यांची उदाहरणंही दिली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना अनुसरून त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या सदरात मांडला. 

एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकारची स्थापना होणं हे घटनाबाह्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी राऊतांनी प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलेल्या भविष्याचा मुद्दाही अधोरेखित केल्याचं पाहायला मिळालं. 'महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकारही डोळ्यात खुपतं आणि सरकारनं घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळं डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागली जाईल', ही आंबेडकरांची भूमिका त्यांनी इथं सर्वांपुढे आणली. 

काही दिवसांपूर्वीच राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करावीत यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणत, धर्मनिरपेक्ष झालात का; असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ज्यानंतर मुख्यमंत्रांनीही या पत्रास उत्तर देत काही मुद्दे स्पष्ट केले होते. ज्यामुळं हा संघर्ष आणखी पेट घेताना दिसला. हीच एकंदर परिस्थिती आणि केंद्रातून भाजप विरोधी सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये निर्माण केलं जाणारं चित्र यावर राऊतांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं.