इचलकरंजी येथे तक्रारींची दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगरपरिषदेच्या आवारातच स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन केले. या घटनेचे शहरात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच समाज संघटनेच्यावतीने नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीकास्त्र उठवले. भोरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह नगरपरिषद बरखास्त करुन प्रशासक नेमावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

Must Read

1) महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग?

2) महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती

3) अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

4) मुंबई आणि पुण्यासाठी Good News

5) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

घंटागाडी चालकाकडून झालेली मारहाण आणि त्या संदर्भात तक्रार करुनही नगरपरिषद प्रशासनाकडून केले गेलेले दुर्लक्ष यामुळे नरेश भोरे यांनी सोमवारी आत्मदहन केले. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून नगरपरिषदेतील कारभारावर सडकून टीका केली जात आहे.

शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन देण्यात आले. नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे नरेश भोरे यांना आत्मदहन करून जीव गमवावा लागला. नगरपरिषद प्रशासन, ठेकेदार व सत्तेतील पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष व गलथानपणामुळे सामाजिक कार्यकर्त्याचा बळी जाणे ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. त्यामुळे या घटनेस कारणीभूत सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा व इचलकरंजी नगरपरिषद बरखास्त करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केली. यावेळी महादेव गौड, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, महेश बोहरा, धनाजी मोरे, शिवाजी पाटील, भरत शिवलिंगे, दादा पारखे, बाळू मधाळे, आण्णासो बिल्लुरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

इचलकरंजी शहर गोंधळी, जोशी, वासुदेव समाज मंडळाच्यावतीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला. या प्रकरणातील दोषी अधिकार्‍यांना निलंबित करुन त्यांना अटक करावी, भोरे कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी, सदर प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करुन सरकारी वकिल म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात, नरेश भोरे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायबद्दल तक्रार केली होती. परंतु नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे त्यांना टोकाचा पाऊल उचलावे लागले.

 भोरे यांनी समाजामध्ये विविध गरजू व्यक्तींना शैक्षणिक, आरोग्य व कला, क्रीडा क्षेत्रासह कळंबा जेलमधील व्यक्तींना योग प्रशिक्षण देण्यासह प्रबोधनाचे काम करीत होते. पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना नाहक बळी गेला असून सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास गोंधळी समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी महेश भिसे, अनिल धुर्वे, रत्नाकर विटेकरी, विलास शिरसोदे, कोंडीबा दवडते आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

समता संघर्ष समितीची आज निदर्शने

नगरपरिषदेच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगरपरिषदेच्या अत्यंत बेजबाबदार कार्यपद्धतीविरोधात आत्मदहन केले. त्यांनी पूर्वकल्पना देऊनही ही अतिशय लांच्छनास्पद घटना घडली हे गंभीर आहे. या घटनेने वस्त्रनगरीची जगभर बदनामी झाली आहे. भोरे यांच्या आत्मदहनाला जबाबदार प्रत्येक घटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि नगरपालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्त करावा यासाठी बुधवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता समता संघर्ष समितीच्यावतीने नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात येणार आहेत.