शहरातील जलशुध्दीकरण केंद्रालगत मोठ्या अर्थपूर्ण व्यवहारातून उभारण्यात येत असलेले दुकानगाळे बेकायदेशीर आहेत. माझा या दुकानगाळ्यांना विरोध नसून गरजू आणि पात्र दुकानदारांना शहरातील सर्वच ठिकाणी जागा उपलब्ध करुन गाळे देण्यात यावेत. बेकायदेशीररित्या उभारण्यात येणार्‍या दुकानगाळ्या संदर्भात शासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

छत्रपती शिवाजी पुतळा ते छत्रपती संभाजी चौक या मार्गावर जलशुध्दीकरण केंद्रालगत छोट्या व्यावसायिकांसाठी मुव्हेबल गाळेऐवजी पक्क्या बांधकामाची दुकानगाळे बांधून दिली जात आहेत. या दुकानगाळ्यांमुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्य मार्गावरील वाहतूकीला अडथळा निर्माण होणार आहे. हे दुकानगाळे अत्यंत चुकीचे व बेकायदेशीर असून त्यामध्ये मोठा ‘अर्थ’ दडला असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी केला.

दुकानगाळे देण्यास माझा कसलाही विरोध नाही. परंतु ते देताना चिठ्ठी पध्दतीने देण्याची गरज होती. गरजू आणि पात्र दुकानदारांना ते मिळण्याची आवश्यकता आहे. मुव्हेबल गाळे असा उल्लेख करुन प्रत्यक्षात पक्के बांधकाम केले आहे. त्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या फेरीवाला संघटनेने पुढाकार घेतला असून नगरपरिषद प्रशासन गप्प का आहे? सध्या उर्वरीत गाळ्यांचे काम सुरु असून त्याच्यासमोरचे संबंधित व्यापार्‍यांनी आपली दुकाने लावल्याने वाहतूकीचा खोळंबा होत आहे. या संदर्भात प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना लेखीपत्र दिले असून हे बेकायदेशीर बांधकाम त्वरीत काढावे अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडून काहीच कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी व शासनाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शहरातील सर्वच ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात यावे असेही ते म्हणाले.

शहरवासियांना 24 तास शुध्द व मुबलक पाणी मिळावे यासाठी विविध 100 ठिकाणी पेयजल प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून 4 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. परंतु काही नतद्रष्ट मंडळी या कामात खोडा घालण्याचे काम करत आहेत. या पेयजल प्रकल्पासाठी नदीतील पाण्याऐवजी कुपनलिकेचे पाणी देण्याचा घाट घातला जात आहे. त्याऐवजी कृष्णा आणि पंचगंगा नदीतील पाण्यावरच हे प्रकल्प सुरु करावेत, असे आमदार आवाडे म्हणाले. शुध्द पाण्यासाठी कट्टीमोळा डोहातून पाणी उचलून ते पंचगंगा जॅकवेलमध्ये आणावे अशी मागणी केली होती. त्यावर नगरपरिषदेकडून निधी नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पासाठी नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समिती आणि शासनाकडे निधी मागणीसाठीचा ठराव पाठवावा. आवश्यक निधी मी उपलब्ध करुन देईन असेही ते म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहनाचा घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. नगरपरिषदेच्या आवारातच या प्रकाराने शहराच्या नावलौकिकाला काळीमा फासली गेली आहे. नगरपरिषद प्रशासनाने सर्वच प्रश्‍नासंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. झालेल्या प्रकाराबाबत प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांचेकडे अहवाल मागितला असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, सुनिल पाटील, अहमद मुजावर उपस्थित होते.