Decision-of-Maharashtra-State-Board

Exam राज्य शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक म्हणजे इयत्ता बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना भाषा विषयासाठी देण्यात येणारी बहुसंची प्रश्नपत्रिका Question paperआता हद्दपार होणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षीपासून मूल्यांकन पद्धतीतही बदल करण्यात आला आहे.

Advertise

बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटणे आणि कॉपीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी २००४ साली राज्य शिक्षण मंडळाने बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकारात परीक्षेत एकामागोमाग बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अ, ब, क, ड अशा तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचे संच सोडविण्यासाठी देण्यात येत होते. त्यामुळे पेपर फुटणे, सामूहिक कॉपी आणि उत्तरपत्रिकेची अदलाबदल करता येणे शक्य होत नव्हते.

विशेषतः पेपरमधील किमान ७५ टक्के प्रश्नांत बदल असल्याने विद्यार्थी आपापला पेपर सोडवायचे. यात कॉपीचे प्रमाण कमी झाले. मात्र, मागील वर्षी अकरावी आणि बारावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम आला. तो लक्षात घेता मूल्यांकनाच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार मार्च २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेपासून बहुसंची प्रश्नपत्रिका बंद होतील.

फेरपरीक्षेसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका

बारावीच्या मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या ‘रिपीटर’ विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयात बहुसंची पद्धतीचाच उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिली.

बोर्डाची मेहनत वाचणार

दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात बहुसंची प्रश्नपत्रिका असल्याने निकाल लावताना बोर्डाला बरीच मेहनत घ्यावी लागायची. यामध्ये प्रामुख्याने चारही प्रश्नपत्रिकेचे गठ्ठे वेगळे करणे, मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांची वेगळी व्यवस्था करणे, अतिरिक्त शिक्षक नेमणे आदी अनेक कामे करावी लागत असे. मात्र, बहुसंची प्रश्नपत्रिका देणे बंद करण्यात आल्याने बोर्डाची मेहनत बरीच कमी होणार आहे.