Main Featured

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर


Darshan-of-Karveer-resident-Ambabai

करवीर निवासिनी अंबाबाईच्या
नवरात्रोत्सवासह वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती भारतासह जगभरातील लोकांना व्हावी यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर व यु-ट्यूब Youtube ही चार अकाऊंट तयार केली आहेत. यापैकी कोणत्याही अकाऊंटवर श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी देवस्थान कोल्हापूर असे इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर लोकांना अंबाबाईच्या पूजांचे दर्शन तर होईलच, शिवाय पालखी सोहळ्यासह आवश्यकती सर्व माहिती फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. भविष्याची गरज म्हणून अंबाबाईची माहिती देणाऱ्या www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळाचेही नुकतेच नुतणीकरण केले आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Advertise

पत्रकार परिषदेपूर्वी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात चारही अकाऊंटचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले. यानंतर संकेतस्थळ व अकाऊंटची अधिक माहिती देताना जाधव म्हणाले, लोकांना अंबाबाईची माहिती ऑनलाईनच्या माध्यमातूनही मिळावी यासाठी दहा वर्षांपूर्वी देवस्थान समितीने संकेतस्थळ तयार केले होते. मराठी व इंग्रजी या दोनच भाषेतून माहिती घेता येत होती. आता बदलेल्या काळानुसार देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना अंबाबाईची माहिती देण्यासाठी मुळच्या संकेतस्थळाचे नुतणीकरण केले आहे. ते करताना अंबाबाई मंदिर, देवीचे महात्म्यसह मंदिरातील सर्व उपक्रम, कार्यक्रम, पालखी सोहळा यांची माहिती तब्बल 50 ते 60 भाषांमधून घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून आता अंबाबाईची माहिती घेता होणार आहे. ही माहिती घेताना अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनासह विविध कार्यक्रम, उपक्रमांचे व्हिडीओ ही पहायला मिळणार आहेत, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेस समितीचे सचिव विजय पोवार, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुदेश देशपांडे व कनिष्ठ अभियंता सुयश पाटील आदी उपस्थित होते.

अश्विनी दानिगोंड व सहकाऱ्यांचा सत्कार
मनोरमा इन्फो. सोल्युशनच्या अश्विनी दानिगोंड व सहकारी शिवेंद्र सावंत, अवधुत भस्मे व शैलेंद्र मोहिते यांनी संकेतस्थळाचे नुतणीकरण केले आहे. त्यांना देवस्थान समिती कर्मचारी मीनल कोठारे, राहुल जगताप व फोटो डिझायनर युवराज शिंदे यांचेही सहकार्य लाभले आहे. या सर्वांचा गरुड मंडपात देवस्थान समितीने सत्कार केला. समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते त्यांनी सत्कार स्वीकारला.