इचलकरंजी शहर व परिसरात पावसाची संततधार कायम असून पावसामुळे तीनबत्ती चौक परिसरात मोठा वृक्ष उन्मळून पडला. या झाडाखाली सापडल्याने एक मोटार व तीन दुचाकी वाहनांचे सुमारे सव्वा लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. काही घरात सांडपाणी शिरल्याने  नागरिकांची तारांबळा उडाली होती. दरम्यान, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वढ होत चालली आहे. नदीच्या पहिल्या घाटावर पाणी आले आहे. चार दिवस सुरु असलेल्या पावसामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत पाणी पातळीत 5 फुटांनी वाढ होऊन ती  48 फुटापर्यंत पोहोचली होती.

Advertise

Must Read

1) कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेच्या पातळीत वाढ

2) SBI चा इशारा ! सणासुदीच्या दरम्यान गायब होऊ शकतात तुमच्या अकाऊंटमधील पैसे

3) सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा

4) ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती

शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यासह घरात शिरल्याचे प्रकार घडले आहे. गणेशनगर, लालनगर आदी भागात सांडपाणी थेट घरात शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास तीनबत्ती चौक परिसरात एक मोठा वृक्ष उन्मळून रस्त्यावरच पडला. या झाडाखाली काही वाहने लावण्यात आलेली होती. त्यातील दोन दुचाकी, एक मोपेड, एक चारचाकी वाहनांवर झाड पडल्याने या वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. या भागात सारण गटारी करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जाते. त्यावेळी रस्त्याकडेला असलेली झाडे पडू नयेत याची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. खोदकाम करताना वृक्षांची मूळे तुटत असल्याने ही झाडे कमकुवत होऊन उन्मळून पडत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काम करणार्‍या मक्तेदारांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

दरम्यान, वृक्ष पडून वाहनांचे नुकसान झाल्याने नगरपरिषदेने त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.