Candidature-from-Shiv-Sena

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या Urmila Matondkar नावाची चर्चा काही दिवसांपासून रंगू लागली होती. याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कलाक्षेत्राच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कंगना रनौत  Kangana Ranaut आणि शिवसेनेच्या संघर्षात उर्मिलानं कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळेही उर्मिलाच्या नावाचा शिवसेना विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उर्मिला मातोंडकर यांनी मार्च 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारीही दिली होती. पण भाजप आमदार गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.  

दरम्यान, 12 जागांवर नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देऊन काही काळाने ही नावं राज्यपालांकडे देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे थेट 12 नावांसह प्रस्ताव येणार की मुख्यमंत्र्यांना नियुक्तीचे अधिकार देऊन नंतर मुख्यमंत्री राज्यपालांना नावं पाठवणार हे अजून अस्पष्ट आहे.