इचलकरंजी येथे शहरातील जलशुद्धीकरण केंद्रालगत उभारण्यात येत असलेल्या दुकानगाळ्याचे बांधकाम हे बेकायदेशीर असून ते त्वरीत थांबवावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. बेकायदेशीर कामास पाठबळ देणार्‍या सत्तारुढ  व प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध नोंदवत आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची बेकायदेशीर कृत्ये चव्हाट्यावर आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, नगरपरिषदेच्यावतीने हे काम थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना इस्टेट विभागाचे सी. डी. पवार व फेरीवाला संघटनेचे दीपक पाटील आणि गाळेधारक यांच्यात शाब्दिक वाद झडला. त्यामुळे दुकानगाळे प्रकरण चांगलेच गाजणार असे दिसू लागले आहे.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

5) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रालगत दुकानगाळे उभारले जात आहेत. हे काम बेकायदेशीर असून या कामात मोठा ‘अर्थ’ दडला आहे असा आरोप करत ते त्वरित थांबवावे अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर दुसरीकडे दुकानगाळे उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी संबंधित गाळेधारकांकडून विधीवत पूजा करून बांधकामाचा शुभारंभ करण्यात येत होता. याच दरम्यान नगरपरिषदेच्या इस्टेट विभागाचे सी. डी. पवार हे त्याठिकाणी आले. 

त्यांनी फेरीवाला संघटनेचे दीपक पाटील यांना दुकानगाळ्यांचे सुरू असलेले बांधकाम त्वरीत थांबवावे असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. कोणाच्या तरी सांगण्यावरुन हे काम बेकायदेशीर ठरत असेल तर नगरपरिषदेने सर्व गाळेधारकांकडून 27 हजार रुपये अनामत रक्कम व दरमहा 1500 रुपयेप्रमाणे वर्षाचे भाडे भरून घेऊन रितसर पावती का दिली? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच नगरपरिषदेकडून झालेला पत्रव्यवहार व पैसे भरल्याच्या पावत्या दाखवत काम थांबणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे पोवार यांनी अतिक्रमण विभागाची गाडी त्याठिकाणी बोलावली. त्यावर पाटील आणि पोवार यांच्यात चर्चा होऊन बांधकामासाठी जे साहित्य तयार करण्यात आले आहे तेवढेच करून काम थांबवण्याचा निर्णय घेत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तेथून निघून गेले.

दरम्यान, सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने सदरचे बेकायदेशीर दुकानगाळ्यांचे काम थांबविण्यात यावे अशी मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. बेकायदेशीर कामास पाठबळ देणार्‍या सत्ताधारी व प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. हे काम न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी, नगरपरिषदेतील सत्ताधारी मंडळी आणि प्रशासनाने अर्थपूर्ण वाटाघाटीतून वर्दळीच्या राज्य मार्गावरील जलशुद्धीकरण केंद्रालगतच दुकानगाळे बांधण्याचा घाट घातला आहेत. मुव्हेबल गाळे असल्याचे सांगत पक्के बांधकाम केले जात आहे. 

हे काम बेकायदेशीर असून ते थांबवावे यासाठी आमदार आवाडे हे स्वतः शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. नगरपरिषदेचा हा प्रकार म्हणजे भ्रष्ट कारभाराचा उत्कृष्ट नमुना असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी कॉ. दत्ता माने, बाबासो कोतवाल, रावसाहेब कांबळे, प्रसाद कुलकर्णी, राजन मुठाणे, अजित मिणेकर, शशिकांत देसाई, ताजुद्दीन खतीब, जावेद मोमीन आदी उपस्थित होते. त्यानंतर सर्व पक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची भेट घेवून सदर बेकायदेशीर दुकानगाळ्यांचे बांधकाम थांबवण्याचीही मागणी केली.