इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश सिताराम भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणाचे पडसाद शहरात सलग दुसर्‍या दिवशी उमटले. नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच भोरे यांचा बळी गेला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्यावतीने प्रांताधिकारी, अप्पर पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दोन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी त्यांना झालेल्या मारहाणीची तक्रार करुनही नगरपरिषद प्रशासनाकडून काहीच दखल न घेतली गेल्याने नगरपरिषदेच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन केले. या प्रकाराने शहरात मोठी खळबळ माजली असून नगरपरिषदेच्या कारभारावर टीका केली जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करुन भोरे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

समता संघर्ष समिती

समता संघर्ष समितीच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी नगरपरिषदेच्या आवारात जोरदार निदर्शने करीत प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. निवेदनात, भोरे यांनी नगरपरिषदेच्या बेजबाबदार कार्यपध्दतीच्या विरोधात आत्मदहन केले. त्यांनी पूर्वकल्पना देऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेला प्रकार हा लांच्छनास्पद आहे. नगरपरिषदेतील वाढता भ्रष्टाचार, प्रशासनाचा मुजोरपणा, अधिकार्‍यांची मस्ती आणि सारे मिळून खाऊ ही विकृती या सर्व गोष्टी अलिकडे वाढत आहेत, 

जनतेच्या चर्चेत आहेत. याबाबत अनेक सामाजिक संस्था, संघटना सातत्याने आवाज उठवत असतात, निवेदने देत असतात. पण तरीही प्रशासन मुजोरीनेच वागते. म्हणूनच या आत्मदहनाला जबाबदार असणार्‍या प्रत्येक घटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि नगरपरिषद बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.  याप्रसंगी प्रसाद कुलकर्णी, कॉ. दत्ता माने, शशांक बावचकर, बजरंग लोणारी, सदा मलाबादे, अजित मिणेकर, किरण कटके, भाऊसाहेब कसबे, शिवाजी साळुंखे, राजू आरगे, अभिजित पटवा, सौ. मंगल सुर्वे, सौ. उषा कांबळे, हणमंत लोहार, सुनिल बारवाडे, रमेश लवटे, संजय टेके, धोंडीबा कुंभार, प्रमोद बेलेकर, गौस अत्तार, विनायक चव्हाण आदी उपस्थित होते.

जनाधार सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट , टेम्पो चालक मालक कल्याणकारी असोशिएशन

जनाधार सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट आणि टेम्पो चालक मालक कल्याणकारी असोशिएशन यांच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नगरपरिषदेतील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराच्या विरोधात भोरे हे सातत्याने आवाज उठवत होते. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांनी तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने भोरे यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले. या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी डॉ. नितीन भाट, डॉ. किरण इंद्रेकर, अन्वर मुल्ला, प्रभू काकणकी, सचिन जाधव, सुरेश साळुंखे, यासीन बाणदार, राजू माने, गोपाल सांगावे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, नरेश भोरे यांनी नगरपरिषदेकडे लेखी स्वरुपात तक्रार केली होती. परंतु नगरपरिषद प्रशासनाने विचार न करता भोरे यांना आत्मदहन करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांच्या अर्जात समावेश असलेल्या व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करुन भोरे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, किरण नामे, सतिश माळगे, नितीन कांबळे, सुहास हुपरीकर, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

संयुक्त लिंबूचौक

संयुक्त लिंबूचौक यांच्यावतीने दिलेल्या निवेदनात, सर्वसामान्य नागरिक अथवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून होणार्‍या तक्रारींची किती गांभिर्याने दखल घेतली जाते हे भोरे प्रकरणावरुन दिसून येते. झाला प्रकार दुर्दैवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनोज खोत, फरीद मुजावर, वासिम मुल्ला, रवि गवळी, नागेश कुंभोजे, सचिन जाधव, निखिल जमाले आदी उपस्थित होते.