Main Featured

राजकारण न करता तातडीने निर्णय घेऊन भरती करावी


 


इचलकरंजी येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्या 42 कर्मचार्‍यांच्या समावेशनात कसलीही अडचण नाही. पण विनाकारण या प्रश्‍नाला वेगळे वळण दिले जात आहे. प्रत्येक कर्मचार्‍याचा जिल्हाधिकार्‍यांनीही नगरपरिषदेकडून अहवाल मागवून घेतला असून त्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भातील प्रस्तावही शासनाला पाठवला आहे. त्यामुळे 42 जणांच्या समावेशनात राजकारण न करता तातडीने निर्णय घेऊन भरती करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. आपल्याला कोणावरही टीका करावयाची नसून शासनाने त्वरीत निर्णय करावा असेही ते म्हणाले.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणखी एक सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक आणि रुग्णालय 300 बेडचे करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आमदार आवाडे यांनी त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर केवळ रुग्णालयाची क्षमता वाढवून उपयोगाचे नसून याठिकाणी बेडच्या क्षमतेच्या प्रमाणात आवश्यक स्टाफची भरतीही गरजेची असल्याचे सांगितले. आयजीएम कडील त्या 42 कर्मचार्‍यांचे समावेशन जुन्या कागदपत्राच्या आधारे होऊ शकत नसल्याचे सांगितले जात असले तरी 10 एप्रिल 2006 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात कसलीही अडचण नाही. सर्वच 42 कर्मचार्‍यांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी नगरपरिषदेकडून मागवून घेतला आहे. त्या सर्वांना सेवेत कायम करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्तावही पाठवला आहे. त्यामुळे त्यांच्या समावेशनात राजकारण न करता त्यांना तातडीने सामावून घेणे आवश्यक आहे.

Must Read

कोरोना (corona virus) च्या कालावधीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन काम करत आहेत. मात्र त्या कर्मचार्‍यांच्या समावेशनाबाबत मुंबईत बैठक होत असताना स्थानिक आमदारांना डावलले आहे. या बैठकीत त्या कर्मचार्‍यांच्या समावेशनाबाबत निर्णय न झाल्यास या प्रश्‍नी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आवाडे म्हणाले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या प्रमाणात राज्यात इचलकरंजीत अग्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात आवश्यक सुविधा आणि कर्मचार्‍यांच्या समावेशनाचा प्रश्‍न वेळेवर सोडवला असता तर अनेक बाधित लोकांचे जीव वाचले असते आणि अनेकांची गैरसोय दूर झाली असती. मात्र उशिरा का होईना सुधारणा होत असल्याचेही ते म्हणाले.

आता घडी विस्कटलेले शहर आणि येथील उद्योग-व्यवसाय सुरळीतपणे सुरु होण्यासह कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे. त्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही आवाडे यांनी सांगितले. यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अशोक सौंदत्तीकर, सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर आदी उपस्थित होते.