Main Featured

Coronavirus चा विस्फोट होत असतानाच WHO ने दिली वाईट बातमी


                                     लस लांबणार! Coronavirus चा विस्फोट होत असतानाच WHO ने दिली वाईट बातमी

 Coronavirus विरोधातली लस निर्माण करण्याचे प्रयत्न जगभरातल्या अनेक देशांमध्ये होत आहेत. रशियाने तर Sputnik V ही लस बाजारातसुद्धा आणली. पण आतापर्यंत स्पर्धेत असलेल्या एकाही लशीकडून WHO च्या निकषाप्रमाणे किमान 50 टक्के क्षमता दाखवलेली नाही, असं संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लसनिर्मितीचा अंतिम टप्पा लांबण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Coronavirus शी लढा द्यायला विविध देशांमध्ये लसनिर्मिती सुरू असल्याची दखल घेतली. यातल्या बहुतेक लशींची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या (Human trials) सुरू आहेत. लस बाजारात उतरवायला सज्ज असणाऱ्या स्पर्धकांमध्ये एकानेही WHO च्या निकषांनुसार निम्मी क्षमता असल्याचे थेट आणि स्पष्ट संदेश दिलेले नाहीत, असं संघटनेने सांगितलं.

लशीला WHO ची मान्यता मिळवण्यासाठी काही निकषांची पूर्तता करणं आवश्यक असतं. ती करायची असेल तर तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी (Phase three trials ) अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे बहुप्रतीक्षित कोरोना लस येण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट बघायला लागू शकते.

Must Read

WHO च्या अंदाजाप्रमाणे पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत कोरोना लस येऊ शकणार नाही. जगात Coronavirus चा फैलाव प्रचंड वेगाने वाढत असतानाच ही वाईट बातमी आरोग्य संघटनेने दिली आहे.

जगभरात आणि विशेष करून भारतात Coronavirus चा विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. जून ते ऑगस्टच्या तुलनेत सर्व रेकॉर्ड मोडत नवीन धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत कोरोनाचा आकडा 39 लाखावर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत म्हणजेच एक दिवसांत जवळपास सर्व रेकॉर्ड मोडून 83 हजार 341 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ही वाढ सर्वात मोठी आहे. तर 1,096 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरू आहे. 24 तासांतली सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ गुरुवारी नोंदवली गेली. 18 हजारांजवळ रुग्ण एका दिवसात सापडले. असं होत असताना आता लशीची आशाही लांब गेल्याने चिंता वाढली आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता देशातले 70 टक्के रुग्ण हे फक्त 5 राज्यात आहेत. अर्थातच त्यात महाराष्ट्राचा क्रमांक वरचा आहे. महाराष्ट्रातखेरीज आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू इथे सर्वाधिक रुग्णवाढ होते आहे.

जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताचा तिसरा तर मृत्यूदराबाबत 83 व्या स्थानावर आहे. 10 लाखांमागे 49 मृत्यू होत असल्याची माहिती मिळाली आहे. देशात मृत्यू दर घटणारा असला आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही रोज जवळपास 76 हजारहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्यानं चिंतेची बाब आहे.