Main Featured

सांगलीला ऑक्सिजन कमी पडण्याची भीती

coronavirus

सांगलीला (Sangli) ऑक्सिजन प्लॅन्ट नाही. कोल्हापूरहून पुरवठा होतो. परंतु तेथेही रुग्णसंख्या वाढू लागल्याने तेथेच ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. सांगलीतही रुग्णसंख्या वाढतच निघाली असून, उद्या यंत्रणा असली तरी ऑक्सिजनचा साठा कमी पडण्याची शक्यता आहे, अशी भीती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant Patil)यांनी व्यक्‍त केली. यासाठीच पुणे-मुंबईसह अन्य राज्यातूनही ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


येथील समस्त जैन समाजाच्या पुढाकाराने सांगलीत वाळवेकर हॉस्पिटल येथे 50 बेडचे महावीर कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन पाटील यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जैन समाजाने पुढाकार घेऊन उभारलेले हे हॉस्पिटल कोरोना (coronavirus)उपचारासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. अशा पद्धतीने अन्य समाजाने आदर्श घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जि.प. कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्‍त नितीन कापडनीस, माजी महापौर सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, मनपा विरोधी पक्षनेते मैनुद्दीन बागवान, डॉ. रवींद्र वाळवेकर, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, चेंबर्सचे अशोक पाटील, जितेंद्र शहा, विवेक शहा आदी उपस्थित होते. 

जयंत पाटील (jayant Patil) म्हणाले, जुलै, ऑगस्टपासून कोरोनाचा उद्रेक होत गेला तशा उपचाराच्या यंत्रणा कमी पडू लागल्या. आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्ससह यंत्रणा तोकडी पडत आहे. आता ग्रामीण पातळीवरही हॉसिपटल्सची सोय केली जात आहे.

सांगली (Sangli), मिरजेत हॉस्पिटल आहेतच, आता इस्लामपूरला 150, जतला 192  बेडचे, तासगाव 110 बेड, कवठेमहांकाळसह अन्य ठिकाणीही हॉस्पिटल उभारली जात आहेत. परंतु मृत्यूचा वाढता दर धोकादायक आहे. आता मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला आहे. यासाठी अन्य ठिकाणाहून त्याचा पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शासकीय यंत्रणेला नावे न ठेवता सामाजिक संघटना, पक्षानेही हॉस्पिटलसाठी पुढाकार घ्यावा. याच हेतूने जैन समाजाच्यावतीने आम्ही अवघ्या आठ दिवसांत हॉस्पिटल साकारले. येथे आयसीयू सेंटरसह 50  ऑक्सिजन बेडची सोय आहे. गोरगरीब रुग्णांना अल्पमोबदल्यात त्याचा लाभ देऊ. डॉ. वाळवेकर म्हणाले, रुग्णांना वाचविण्यासाठी यंत्रणा ताकदीने काम करेल.