Main Featured

सीमेवर प्रचंड तणाव


पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh)यांनी काल रात्री मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगही यांची भेट घेतली. रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका हॉटेलमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० च्या सुमारास ही बैठक सुरु झाली. जवळपास दोन तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारताकडून संरक्षण सचिव अजय कुमार आणि रशियातील भारताचे राजदूत डी.बी.वेंकटेश वर्मा सुद्धा या बैठकीत सहभागी झाले होते.


शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी राजनाथ सिंह (Rajnath singh)रशियाला गेले आहेत. चीनचे संरक्षण मंत्री सुद्धा या परिषदेसाठी तेथे आले आहेत. चीनकडून या बैठकीची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात लडाखमध्ये सुरु झालेल्या सीमावादानंतर प्रथमच दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये झालेली ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे. 
Must Read

पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आधी होती तशी, ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण करा, असे राजनाथ सिंह यांनी बैठकीत स्पष्ट केले.  जवळपास दोन तासापेक्षा जास्तवेळ चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ सुरु असलेल्या सीमावादावर तोडगा काढण्याचे काय मार्ग आहेत,  त्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीआधी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली.
२९-३० ऑगस्टच्या रात्री पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर कालच्या बैठकीत भारताच्या शिष्टमंडळाने चीनकडे आक्षेप नोंदवला अशी माहिती सूत्रांनी दिली.
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत राजनाथ सिंह काय म्हणाले?
विश्वासाचे वातावरण, अनाक्रमण, एकमेकांबाबत संवेदनशीलता, मतभेदांचे शांततामय निराकरण या गोष्टी प्रादेशिक शांतता व स्थिरतेसाठी गरजेच्या आहेत, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत व्यक्त केले. भारत (India) व चीन (China) यांच्यात पूर्व लडाखमध्ये संघर्ष सुरू असताना  त्यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे.
राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या महायुद्धाची आठवण देऊन सांगितले की, महायुद्धाच्या आठवणीतून आपल्याला आक्रमणातील मूर्खपणा व विफलता लक्षात येते. त्यातून विध्वंसाशिवाय काहीच साध्य झाले नाही. या विध्वंसाचा फटका सर्वच देशांना  बसला. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वे फेंग यावेळी उपस्थित होते.