-beds-will-be-added-in-covid-Center-in-Kolhapur-district

Kolhapur जिल्ह्यात 400 ऑक्सिजनेटेड (oxygen)आणि 300 आयसीयू अशा 700 वाढीव बेडच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 


येत्या काही दिवसांत Kolhapur जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सूक्ष्म नियोजन करा, 10 ते 15 टक्के अतिरिक्‍त बेडची व्यवस्था करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ऑक्सिजनचा (oxygen) तुटवडा दोन दिवसांत दूर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Must Read

कोल्हापूर जिल्हा सध्या क्रिटिकल फेजमधून जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे, असे सांगत राव म्हणाले, जिल्ह्यात प्रारंभी कोरोनाचा प्रसार कमी होता. पॉझिटिव्हिटी रेट कमी आणि रिकव्हरी रेट अधिक असे चित्र होते. मात्र, सध्या रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यापूर्वी  रुग्ण आढळलेली गावे, शहरातील  विविध भागात सध्या डाऊनमॉल सुरू आहे. नवीन परिसरात मात्र रुग्णवाढ वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे.
राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे. लक्षणे असलेल्या नागरिकांची स्वॅब तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत दहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, असे सांगत ते म्हणाले, या मोहिमेमुळे लक्षणे तीव्र होण्यापूर्वीच संबंधितांवर उपचार सुरू करता येणार आहे. जिल्ह्यातील सध्याचा मृत्यूदर कमी करणे हा प्रमुख उद्देश आहे. तो या मोहिमेमुळे यशस्वी होईल.
जिल्ह्यात 700 बेड आणखी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. त्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. याकरिता आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करण्याबाबत आवश्यक टेंडर प्रक्रिया सुरू करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मनुष्यबळ आणि साधनसामग्री वेळेत उपलब्ध झाली तर येत्या तीन आठवड्यांत हे सर्व बेड कार्यान्वित होतील, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक ठिकाणी अतिरिक्‍त 10-15 बेडची व्यवस्था करावी, अशी सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याचे नियोजन करा, असे सांगत जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये आजअखेर एकूण दीड हजार बेड रिकामे आहेत. मात्र, कोरोना आरोग्य केंद्र आणि कोरोना रुग्णालयात तशी परिस्थिती नाही, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी आवश्यक निधीबाबत पाठपुरावा सुरू आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनत समावेशाबाबत खासगी रुग्णालयाच्या प्रलंबित प्रस्तावांना तत्काळ मान्यता द्यावी यासाठीही प्रयत्न केले जाते जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी उपस्थित होते.