Main Featured

कोल्हापूरकरांची चिंता वाढविणारी बातमी

Kolhapur coronavirus updates

Kolhapur- जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत (coronavirus) वाढच होत आहे. यात बुधवारी बारा ते गुरुवारी रात्री बारापर्यंत ९३९ इतके उच्चांकी नवे बाधित सापडले आहेत, तर याच कालावधीत जवळपास ३५९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. १९ बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र काही भागात जरूर आहे. यात गगनबावडा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी तालुक्‍यात बाधितांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे कोल्हापूर शहरासह करवीर, हातकणंगले तालुक्‍यात बाधितांचे प्रमाण वाढते आहे.


Must Read


या तालुक्‍यातील बहुतांशी रूग्ण शहरात उपचाराला येत आहेत. यात गेल्या तीन दिवसात शहरात सातशेपेक्षा अधिक संख्येने बाधित सापडले आहेत. या सर्वांवर शहरातील सहा कोविड सेंटरसह सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या बाधितात एकूण १२६ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील १४ शासकीय रूग्णालयात एक हजार २०० व्यक्तींचे नवीन स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 


तालुकानिहाय बाधित 


कोल्हापूर शहर १७८, इचलकरंजी ८१, शिरोळ ४५, करवीर ९८, हातकणंगले ९०, कागल ४४, आजरा ५० , पन्हाळा २४ , गडहिंग्लज ३६ अन्य तालुक्‍यात ३ ते १५ बाधित आढळलेले आहेत.


कोल्हापूरची (Kolhapur) स्थिती चिंताजनक


कोल्हापुरातील गेल्या तीन महिन्यातील कोरोनाच्या वाढत्या (coronavirus) संसर्गाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिंता व्यक्त केली. जिल्ह्याला कोरोना लढ्यात काही अडचण असल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन सहकार्य करेल, मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोल्हापूरसह सातारा, सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतला. 

त्यात त्यांनी कोल्हापुरविषयी चिंता व्यक्त केली. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे शक्‍य आहे. येथील सर्वसामान्यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता, त्याचपद्धतीने कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्‍यक असल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.