Main Featured

कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी


                               

कोणी प्रियसीची, कोणी पत्नीची तर कोणी मैत्रिणीची हौस-मौज पुरवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण चोऱ्या करून मिळणाऱ्या पैशांतून पत्नीची हौस पूर्ण करणारा महाबिलंदर राजारामपुरी पोलिसांच्या हाती लागला.

महेश राजाराम गायकवाड (वय २२, रा. गणेश मंदिरशेजारी, गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी व ८ मोबाईल हँडसेट असा सुमारे २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचा साथीदार प्रकाश शांताराम कोकाटे (रा. मोतीनगर) हा अद्याप फरारी आहे.

राजरामपूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोबाईल जबरदस्तीने काढून चोरीच्या अनेक घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांनी गुन्हे शोधपथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संबंधित चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलिसांनी महेश गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पत्नीची हौस पूर्ण करण्यासाठी दुचाकी व मोबाईल हॅडसेट चोरी केल्याचे कबूल केले. त्याने ह्या चोऱ्या साथीदार प्रकाश शांताराम कोकाटे याच्यासोबत केल्याचेही सांगितले.

हे वाचून तर बघा....


रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल हिसकावून घेणे, शहर व परिसरातील दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कोकाटेचा शोध घेतला पण तो फरारी आहे. पोलिसांनी अटक केलेल्या महेश गायकवाड याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी व आठ मोबाईल हॅडसेट असा सुमारे २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, हवालदार आनंदा निगडे, पोलीस नाईक प्रकाश पारधी, सुभाष चौगले, प्रवीण पाटील, रोहन पोवार, महेश पाटील, रवीकुमार आंबेकर, तानाजी दावणेकर, विशाल खराडे, प्रशांत पाथरे, सिध्देश्वर केदार आदींनी केली.

काही महिन्यांपूर्वीच केला प्रेमविवाह


महेश गायकवाड याचा काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेला आहे. विवाहापूर्वी त्याने पत्नीच्या हौस-मौज पुरवल्या होत्या. विवाहानंतर त्या पुरवण्यात अडचणी उभारल्याने त्याने चोरीचा मार्ग शोधला होता.