BJP



एम्सचा रिपोर्ट आल्यानंतर भाजपचं (BJP) तोंड काळ होण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी केलीय. सुशांतसिंह राजपूतचा (sushant singh rajput)राजकारणासाठी वापर करणं भाजपला महागात पडणार असल्याचे ते म्हणाले. भाजपचा खरा चेहरा समोर आलाय. गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांना (police)अतिशय वाईट पद्धतीने बदनाम केलं. महाराष्ट्राचा अपमान केला. गुप्तेश्वर पांडेना उगीचच सहज व्हीआरएस मिळाली नाही. पण महाराष्ट्रातील जनता भाजपला माफ करणार नाही असा टोला सावंत यांनी लगावलाय. 

तिन्ही एजन्सीना राजकीय षढयंत्र करुन महाराष्ट्रात आणलं गेलं. CRPC तसेच संघराज्य प्रणालीच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. बिहार पोलिसांचा उपयोग राजकारणासाठी केला गेला. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर आरोप करण्यात आल्याचे सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल असे सावंत म्हणाले. फडणवीसांनी याला निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल असे देखील सावंत म्हणाले. 

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे गुप्तेश्वर पांडे चर्चेत आले होते. सेवानिवृत्तीनंतर पांडे राजकारणात प्रवेश करतील, अशीही चर्चा होती. या सगळ्या प्रश्नांवर गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


'मागच्या २ महिन्यांमध्ये मला खूप त्रास देण्यात आला. या काळात माझं आयुष्य दयनीय झालं होतं. या काळात मला हजारो फोन आले आणि माझ्या निवृत्तीबद्दल विचारणा झाली. यामुळे मला कंटाळा आला होता,' असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले. 

बिहार पोलिसांना मुंबईमध्ये चुकीची वागणूक देण्यात आली, बिहारच्या अस्मितेसाठी मी लढलो. सुशांत प्रकरणामुळे मी सेवानिवृत्ती घेतोय, असं कोणाला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. सेवानिवृत्ती घेणं हा माझा संविधानिक अधिकार आहे. मला फक्त सुशांतच्या म्हाताऱ्या वडिलांना मदत करायची होती. सुप्रीम कोर्टानेही बिहार पोलिसांना(police) पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया पांडे यांनी दिली. 

३४ वर्षांच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीच गुन्हेगारांसोबत तडजोड केली नाही. ५० पेक्षा जास्त एन्काऊंटरमध्ये मी सहभागी झालो होतो. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही, तसंच याबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. राजकारणात प्रवेश न करताही मी सामाजिक कार्य करु शकतो, असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं. 

गुप्तेश्वर पांडे १९८७ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी होते. ३१ जानेवारी २०१९ रोजी गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी बनले, ते सुशांत प्रकरणांबद्दल राष्ट्रीय चर्चेत आले. डीजीपी म्हणून गुप्तेश्वर पांडे यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत होता. अलीकडील काळात, ते वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहीले. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधन प्रकरणात ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेसाठी आले होते. 

सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केला असता गुप्तेश्वर पांडे यांनीही रिया संदर्भात औकात काढून वाद निर्माण केला.  नंतर, त्यांना यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागले.