Main Featured

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलं


Congress leader Sanjay Nirupam target Shivsena Sanjay Raut Statement on Kangana Ranaut | शिवसेनेकडून छ. शिवाजी महाराजांचा अपमान; काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलं

अभिनेत्री
 कंगना राणौत हिच्यावर शिवसेना Shiv Sena नेते संजय राऊत यांनी केलेल्या अर्वाच्च भाषेचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्या विधानावर आक्षेप घेत शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. कंगनाचं मुंबईबद्दल विधान चुकीचं आहे, त्याचा आम्ही विरोध करतो पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे असं निरुपम म्हणाले आहेत.

याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना राणौतनं मुंबईबद्दल जे भाष्य केले आहे ते आम्हा कोणालाच मान्य नाही. तिच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला. पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे Chhatrapati Shivaji Maharaj नाव घेऊन कंगनावर अर्वाच्च भाषेचा वापर केला. ही शिवसेनेची निराशा आहे. छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणे हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

कंगनानं आणखी एक ट्विट केले. त्यात लिहिलं होतं, एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मी ड्रग्स आणि फिल्म माफिया यांच्याविरोधात आवाज उठवला. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपासात दुर्लक्ष केले. त्यामुळे मुंबई पोलिसांवर मला विश्वास नाही. मला असुरक्षित वाटत आहे. याचा अर्थ मी फिल्म इंडस्ट्री आणि मुंबईचा तिरस्कार करते असा होतो का? असं तिने विचारलं

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.

कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा

कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.

कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते.