Main Featured

राजू शेट्टी यांना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन


raju shetti

तीन आमदार आणि एक खासदारनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते 
राजू शेट्टी Raju Shetty यांनाही करोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांनी घरीच उपचार सुरू केले आहेत.

जिल्ह्यात यापूर्वी खासदार संजय मंडलिक , आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील आणि प्रकाश आवडे यांच्याबरोबरच निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी करोना चाचणी करून घेतली त्यामध्ये त्यांच्या फुप्फुसांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे त्यांनी घरातच उपचार सुरू केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी दुध दराबाबात आंदोलन केलं होतं. त्यासाठी महाराष्ट्रभर ते फिरत होते. त्याच दरम्यान त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना करोनाची चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यांसदर्भात त्यांनी एक पोस्टही लिहली आहे.

'काल माझी करोना टेस्ट निगेटीव्ह आली, पण काल रात्रीपासून मला थोडा ताप येऊन अस्वथ वाटू लागले म्हणून मी डॉक्टरांकडे जाऊन HRCT टेस्ट केली व त्यातून समजले की माझ्या फुप्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचं लक्षात आलं करोना पॉझिटिव्हचीच लक्षणे आहेत, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घरी राहूनच उपचार घेत आहे, करोना मान-सन्मान ठेवत नाही तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, त्यामुळे माझ्या संपर्कात आल्याने आपण सुरक्षित राहाल, हा भ्रम मनातून काढून टाका. माझ्या संपर्कात आल्याने दुस-या कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला तर माझ्या मनावर त्याचं ओझं राहील , याची जाणीव ठेवून मी काही काळासाठी स्वत:ला घरी क्वारंटाईन करण्याचं ठरवलं आहे. कृपया आपणही मला या गोष्टीसाठी साथ द्या,' असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा कहर प्रचंड प्रमाणात सुरू आहे. आज दिवसभरात एक हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत आकडा सत्तावीस हजारावर पोहोचला आहे. दिवसभरात २४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आठशे पर्यंत पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात करोना बाबतची चिंता वाढली आहे.