Main Featured

इचलकरंजीकडेही लक्ष देऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा


 इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आवाडे केवळ प्रसिद्धीसाठी समाजकार्य करत नाही. तीन मंत्र्यांनी आयजीएमच्या 42 कर्मचार्‍यांचा प्रश्‍न मनावर घेतला असता तर तो सहज सुटला असता. मात्र तसे न झाल्यामुळे आमदार आवाडे यांनी आपली खदखद व्यक्त केली. तीन मंत्र्यांनी आपल्या मतदार संघाप्रमाणे इचलकरंजीकडेही लक्ष देऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा, असे स्पष्टीकरण नगरसेवक सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी सुनील पाटील यांनी सांगितले, गेल्या 4-5 महिन्यापासून कोरोनाच्या काळात आवाडे कुटुंबियांसह ताराराणी पक्षाने झोकुन काम केले आहे. पगारांसाठी रखडलेली होमगार्ड नियुक्ती, आशा वर्कर्सना मानधन, परप्रांतिय, गरजुंना दोनवेळचे जेवण यासह जनहिताची अनेक कामे केवळ समाजकार्य म्हणून केली. आम्ही आमचे कर्तव्य म्हणून करत आहे वेळप्रसंगी पदरमोडही करत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने आरोग्य सुविधेबरोबरच आयजीएम रुग्णालय सक्षम करण्यासाठी आमदार आवाडे प्रयत्नशिल आहेत. 

जिल्ह्यातील तीन मंत्र्यांनी वेळीच रुग्णालय सक्षमीकरणाकडे लक्ष दिले असते तर जनतेलाच सुविधा मिळाली असती. मात्र तसे न झाल्याने आवाडे यांनी खंत व्यक्त केली आहे. आवाडे यांनी स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम केले नाही. केवळ जनसेवेचे काम करत असून भविष्यात सुद्धा यापेक्षा अधिक वेगाने कार्यरत राहतील आणि आम्ही त्यांच्यासोबत राहु अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शिक्षण सभापती राजु बोंद्रे, नगरसेवक दिपक सुर्वे उपस्थित होते.