Main Featured

ताबा सुटलेला भरधाव ट्रक घुसला दुकानांमध्ये : एकाचा मृत्यू

Looted truck rammed into shops

इचलकरंजी-सांगली रस्त्यावरील बिग बझार लगत चालकाचा ताबा (control) सुटलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने कबनूर येथील राहुल रावसाहेब पाटील (वय 28) हा युवक ठार झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. तब्बल दोन तासाहून अधिक काळ राहुल याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. या अपघातात मोटरसायकलसह गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, श्रेया ब्युटी पार्लर या दोन दुकानांसह दुकानातील साहित्य मिळून सुमारे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकचा चालक विलास ईश्‍वर जंगम (वय 60 रा. इस्पुर्ली ता. करवीर) याला अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लालनगर परिसरातून कापडाच्या गाठी भरून चालक विलास जंगम हा ट्रक (क्र. एमएच 09 सीयु 7816) घेऊन इचलकरंजीहून राजस्थानमधील पाली-बालोत्राकडे निघाला होता. सीईटीपी रिंगरोडवरुन ट्रक जात असताना बिग बझारसमोर सांगलीच्या दिशेने वळण घेत असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि भरधाव असलेला ट्रक थेट रस्ता ओलांडून बिग बझार शेजारी असलेल्या गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स व श्रेया ब्युटी पार्लर या दुकानात घुसला. त्याचवेळी राहुल पाटील सांगली नाक्याकडून घरी निघाला होता. रस्ता ओलांडून  भरधाव निघालेल्या ट्रकने राहुल याच्या मोटरसायकल (क्र. एमएच 09 इपी 6677) ला जोराची धडक देत सुमारे 20 फुट अंतरापर्यंत राहुल याला मोटरसायकलसमवेत फरफटत नेले. त्यामध्ये मोटरसायकलीचा चुराडा झाला. तर राहुल हा ट्रक व दुकानासमोरील कठडा यामध्ये अडकला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तेथून काढण्यासाठी सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने मदत कार्यात अडथळा येत असल्याने पोलिसांना सौम्य छडीमार करावा लागला. अखेर दोन क्रेन मागवून त्याद्वारे ट्रक मागे हटवून राहुल याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार, गावभागचे प्रभारी पोलिस निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट देऊन पाहणी केली.

अपघाताचे वृत्त कळताच राहुल याचे नातेवाईक आणि मित्रांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यांचा आक्रोश उपस्थितांचा हेलावून सोडत होता. या अपघातात ट्रकसह श्रेया ब्युटी पार्लर, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानांचे तसेच दुकानातील साहित्य, इमारत, मोटरसायकल आदींचे सुमारे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघाताची वर्दी आकाश बाबुराव देवकाते यांनी दिली आहे. मयत राहुल याच्या पश्‍चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. राहुल हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. त्याच्या अशा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.