Main Featured

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सविस्तर व सकारात्मक चर्चा


 

Health Minister Rajesh Tope detailed and positive discussion

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय एनएनबीएल अ‍ॅक्रिडेशनप्रमाणे प्लॅन तयार करुन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व्हावे, रुग्णालयाकडील 42 कर्मचार्‍यांचे शासनाच्या आरोग्य विभागाने समावेशन करुन घ्यावे, रुग्णालय 300 बेडचे करावे त्याचबरोबर रुग्णालय व निवासस्थान दुरुस्तीसाठी मंजूर निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा, या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांच्या पुढाकाराने आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. लवकरात लवकर हे प्रश्‍नी मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील विविध प्रश्‍नासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी  शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु केला. आयजीएम रुग्णालयाच्या हस्तांतरणावेळी नकार दर्शविलेल्या 42 कर्मचार्‍यांचे तातडीने शासनाने समावेशन करुन घ्यावे, रुग्णालय आणि कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेला 18.27 कोटीचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा, कोविडच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालय 300 बेडचे करावे या प्रश्‍नी आमदार आवाडे यांनी केलेल्या विनंतीनुसार आरोग्यमंत्री टोपे यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली. 

या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जीएडी सामान्य विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सहसचिव मनोहर ठोंबरे, नगरविकास विभागाचे सहसचिव स. ज. मोघे, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव अश्‍विनी सैनी, आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे, सहसंचालक डॉ. नितीन आंबोडकर, कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, आयजीएमचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आर. आर. शेटे आदी उपस्थित होते.

आमदार आवाडे म्हणाले, 42 कर्मचार्‍यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिलेला अहवाल आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत तो अहवाल आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना सेवेत सामावून घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले.  त्यावर आरोग्यमंत्र्यांनी संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, हे शासकीय रुग्णालय राज्यातील अग्रणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी एनएबीएल अ‍ॅक्रिडेशननुसार प्लॅन तयार करुन घ्यावा. या रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरु असून त्याठिकाणी आवश्यक व्हेंटीलेटरची तातडीने उपलब्धता करुन देण्याची मागणी केली आहे. 

आयजीएम रुग्णालय 300 बेडची करण्याचे पालकमंत्र्यांनी मागणी केली असून त्यालाही तातडीने मंजूरी द्यावी यासह रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा, साधनसाम्रगीसह अत्यावश्यक डॉक्टर, स्टाफ नर्स, कर्मचारी यांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात सविस्तर माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. त्यावर चर्चेत आरोग्यमंत्री टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याचे सांगितले.