Exam-Practice-questions-schedule-announced

Exam
विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून
एमसीक्यू MCQ (सराव बहुपर्यायी उत्तर असलेले प्रश्न), वेळापत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केले. याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाने एमसीक्यू महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करा, अशा सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या. मॉक टेस्टही घ्यायच्या असून यासंबंधी अहवाल लीड महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळवायचा आहे जेणेकरून ते त्यांच्या अखत्यारीतील अहवाल एकत्रित सादर करू शकतील, असे निर्देशही दिले.

Advertise

परीक्षेसाठी अवघे काही दिवस उरले असताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रश्नसंच, सराव प्रश्न न मिळाल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना दिल्या. दरम्यान, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यापीठाच्या १४ विभागांनी दिलेल्या एमसीक्यूमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्रात समाविष्ट प्रकरणांवर सराव एमसीक्यू दिले आहेत. या सराव एमसीक्यूची संख्या ५ ते २५ अशी आहे.
विविध अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिकांचे, बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या व नियमित विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रकही दिले आहे. परीक्षा होऊन निकाल जाहीर होईपर्यंत प्राचार्य, उपप्राचार्यांनी सुट्टी घेऊ नये तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयात हजर राहावे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता प्रचंड गोंधळाची आहे. त्यामुळे या कालावधीत त्यांना परीक्षेविषयी योग्य माहिती मिळावी किंवा अडचणी असल्यास त्या सोडविण्याच्या दृष्टीने महाविद्यालयात हेल्पडेस्कची सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही महाविद्यालयांना दिले.
इतर महाविद्यालये, शैक्षणिक विभाग, दूर व मुक्त अध्ययन संस्था यांचे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात राहत असतील व त्यांनी आपल्या महाविद्यालयास परीक्षेसाठी काही मदत मागितली तर ती सुविधा पुरवावी, असेही परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील यांनी सूचनांमध्ये म्हटले आहे.
आॅनलाइन संवाद साधण्याचे निर्देश

परीक्षा कशी असेल? पद्धती काय असेल? आॅनलाइन पद्धतीने परीक्षा देताना अडचणी येतील त्या कशा सोडवाव्यात? यासंबंधी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी आॅनलाइन संवाद साधावा व परीक्षेसंबंधी माहिती द्यावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.