Main Featured

९०२ नवीन रुग्ण, २७ जणांचा मृत्यू


                                   corona 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अपुऱ्या यंत्रणेसह कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य प्रशासनाने आता मात्र कोरोनासमोर हात टेकले आहेत. एकीकडे बेड उपलब्ध करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे बाधितांची संख्या मात्र घटायचे नाव घेईना. गुरुवारी जिल्ह्यात ९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ जणांचा मृत्यू झाला.


एकीकडे कोरोना दिवसेंदिवस उग्र रूप दाखवीत असताना जिल्ह्यातील जनता मात्र तितकीशी गांभीर्याने वागत असल्याचे चित्र नाही. जिल्ह्याच्या तीन-चार तालुक्यांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता कोल्हापूर शहरातही तो पाळावा, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दोन दिवसांपूर्वी केले. परंतु त्याला काही व्यापारी, रिक्षा संघटनांचा विरोध होत आहे.

सर्वसामान्य जनतेची जनता कर्फ्यू लागू करण्याची तयारी असताना, दुसऱ्या बाजूने काहीजण त्याला खोडा घालत आहेत; त्यामुळे कोल्हापुरात, शुक्रवारपासून होणाऱ्या जनता कर्फ्यूबाबत संदिग्ध वातावरण आहे.

हे वाचा


जिल्ह्यात कोल्हापूर शहरासह करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यांत कोरोनाचा उद्रेक मोठा आहे. इचलकरंजी शहरातील नवीन वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी या तालुक्यांत रुग्णसंख्या घटत असली तरी साखळी काही तुटत नाही. नवीन रुग्ण समोर येतच आहेत. कोल्हापूर शहराची परिस्थिती तर अगदीच खराब आहे. कोल्हापूर शहराने रुग्णांचा दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

जिल्ह्यात नवीन नोंद झालेल्या ९०२ रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३२ हजार ५२२ वर गेली आहे, तर मागच्या २४ तासांतील २७ जणांच्या मृत्यूमुळे हा आकडा ९८५ पर्यंत पोहोचला आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे.