Main Featured

CoronaVirus News : अरे व्वा! 105 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात


105 year old woman outshines corona virus

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहे. अनेकांनी कोरोनाचं हे महाभयंकर युद्ध जिंकलं आहे. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यात राहणाऱ्या 105 वर्षीय आजींनी कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी घरीच उपचार घेऊन कोरोनाची लढाई जिंकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमलाअम्मा लिंगानागौडा हिरेगौडर असं या आजींचं नाव असून त्या कोप्पल तालुक्यातील कतारकी गावच्या रहिवाशी आहेत. काही दिवसांपासून आजींना ताप येत होता. ताप आल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. कमलाअम्मा यांना आरोग्याच्या इतर कोणत्याही समस्या नव्हत्या. यामुळेच त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आणि आपल्या मुलाच्या घरी विलगीकरणात राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला. 

कमलाअम्मांनी घरीच उपचार घेत कोरोनाला हरवलं

105 वर्षीय आजींचे नातू श्रीनिवास  हे व्यवसायाने डॉक्टर आहे. श्रीनिवास यांच्याच देखरेखीखाली उपचार घेत कमलाअम्मानी कोरोनावर मात केली आहे. कमलाअम्मांचं वय पाहता त्यांच्यावर घरीच उपचार करणे अतिशय आव्हानात्मक होतं अशी माहिती त्यांचे डॉक्टर नातू श्रीनिवास यांनी दीली आहे. मात्र आजींना आरोग्याच्या इतर कोणत्याही तक्रारी नसल्याने त्यांच्यावर सामान्य उपचार करण्यात आले. घरीच उपचार घेत त्यांनी कोरोनाला हरवलं. त्यांना काही मर्यादित औषधेच देण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनातून बरे झालेल्यांनी करावीत योगासने- आरोग्य मंत्रालय

कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी च्यवनप्राशचे सेवन करावे तसेच योगासने, ध्यानधारणा करावी तसेच रोज गुळण्या व पायी चालण्याचा व्यायाम करावा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात म्हटले आहे की, ज्या कोरोना रुग्णांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेतले व बरे झाले त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनातून बरे झालेल्या लोकांनीही यापुढे मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार धुणे या गोष्टी पाळाव्यात. गरम पाणी प्यावे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेली औषधी घेत जावीत. या औषधींची नावे व किती प्रमाणात घ्यावीत याचा तपशील आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आला आहे.

नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी पौष्टिक आहार घ्यावा. पचायला सोपे व ताजे अन्न खाण्यावर भर द्यावा. तसेच रोज पुरेशी झोप घ्यावी. धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त व्याधी असतील व तो कोरोनाच्या संसर्गातून बरा झालेला असेल तर अशाने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य ती औषधी घ्यावी. कोरोनातून बरे झालेल्यांनी आपले अनुभव सोशल मीडिया, नातेवाईक, मित्र यांच्यामार्फत सर्वांना कळवावेत. त्यामुळे या आजाराविरोधात लढण्यास लोकांना मानसिक पाठबळ मिळेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.