Main Featured

परवानगी असो वा नसो २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणार; एमआयएम आक्रमक


masjidराज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्याची सर्वच स्तरातून मागणी होत असताना आता एमआयएमनेही  (MIM) आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने धार्मिकस्थळे सुरू करण्याची परवानगी दिली किंवा नाही दिली तरी काही फरक पडत नाही. आम्ही २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणार आहोत. त्याची सुरुवात औरंगाबादपासून होईल, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने धार्मिकस्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. अनेक राज्यात धार्मिकस्थळे सुरू केले असून या ठिकाणाहून कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात मात्र धार्मिकस्थळे सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यासाठी करोनाचं कारण दिलं जात आहे. दारुची दुकाने सुरू करण्यासाठी मात्र कोणतंच कारण आडवं येत नाही, असं सांगतानाच १ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. त्यानंतर २ तारखेपासून आम्ही मशिदी सुरू करणार आहोत. कुणी धार्मिकस्थळे सुरू करो अथवा न करो. सरकारची परवानगी असो वा नसो, आम्ही मात्र मशिदी सुरू करू. औरंगाबादच्या शहागंजमधील मशिदीत मी स्वत: जाऊन मशीद सुरू करणार आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Must Read

1) Unlock 4: देशातील जनतेला अनलॉक-४ चे वेध; यादीत फक्त निर्बंध असलेल्या गोष्टी!

2) मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, रिपोर्ट पॉझिटिव्ह पण 11287 रुग्णांना लक्षणं नाहीत

3) मुंबईतल्या या 2 ठिकाणी गेली दीडशे वर्ष कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका?

4) दरवाढीला ब्रेक ; पेट्रोल-डिझेलचा हा आहे आजचा दर


आमचा सरकारला २ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम आहे. त्यांनी तोपर्यंत धार्मिकस्थळे सुरू करावीत. सरकारने परवानगी नाकारताना काहीही लॉजिक दिलं तरी आम्ही ते स्वीकारणार नाही. किंबहूना आम्ही सरकारच्या परवानगीची वाटही पाहणार नाही. २ सप्टेंबरपासून मशिदी सुरू करणारच. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन करण्यात येईल. तोंडाला मास्कही लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. करोनाचा कहर सुरू झाल्यानंतर वैद्यकीय व्यवस्था आणि यंत्रणा उभारण्यासाठी सरकारला सहा महिने देण्यात आले. तेवढे महिने पुरेसे आहेत, त्यामुळे आता आम्ही सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार नाही, असंही ते म्हणाले.


दरम्यान, मंदिरं सुरू करा, या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीने या आंदोलनाची हाक दिली आहे. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केली आहे.