Main Featured

सावधान... गुगल कस्टमर केअरचा नंबर हॅकरचा आहे...!Warning ... Google Customer Care number belongs to a hacker ...! | सावधान... गुुुगल कस्टमर केअरचा नंबर हॅकरचा आहे...!
गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधताय..? सावधान...! तो नंबर हॅकरचा असून त्यातून तुम्हांला गंडा घातला जाऊ शकतो, असे आवाहन  पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे. लोकंमतमध्ये मंगळवारी मोबाईल रिचार्ज करताना २२ हजारांचा ऑनलाईन गंडा,असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांनी हे आवाहन केले आहे.
नागरिक दैनंदिन जीवनात पैसे देणे-घेणे लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, ऑनलाईन शॉपिंग करून त्याचे पैसे गुगल पे, फोन पे, पेटीएम, मोबीक्विक, एअरटेल मनी, इत्यादी ऑनलाईन पेमेंट वॉलेटद्वारे करतात. बऱ्याच वेळा रक्कम खात्यावर जमा न झाल्यास ग्राहक त्या वॉलेटचा कस्टमर केअर नंबर मिळविण्यासाठी गुगलवर सर्च करतात. त्यावर हे नंबर मिळतात; परंतु ते ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांचे असतात, असे स्पष्ट झाले आहे.
फसवणूक झालेल्या ग्राहकाने मोबाईल रिचार्ज झाला नाही म्हटल्यावर ८३९१९९२२३९ व ९१२३३९७३४२ हे नंबर शोधून काढले. त्यावर संपर्क साधल्यावर त्यांनी एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते केल्यावर ग्राहकाच्या खात्यातून ५३० रुपयांच्या बिलासाठी २२ हजार २२० रुपये गेले.
सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी हा नवा मार्ग शोधला आहे. अशा फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत.लक्षात ठेवा, कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर नंबर हा १८००.... असा दहा अंकी असतो. तसा तो नसल्यास तत्काळ सावध व्हावे.कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच हा नंबर मिळवा. ऑनलाईन व्यवहार पूर्ण न झाल्यास बँकेत जाऊन त्याबाबत तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बनावट वेब पेजेस
सायबर गुन्हेगारांनी प्रत्येक वॉलेटचे बनावट वेबपेजेस तयार केले असून फसवणूक करण्यासाठी त्यावर त्यांनी स्वत:चे नंबर दिले आहेत. त्यामुळे पेमेंट वॉलेटवरून रक्कम पोहोचली नसल्यास घाबरून अन्य मार्गांचा शोध घेऊ नका.