Main Featured

JEE- NEET परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा दबाव होता, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांचा दावा
देशभरातून जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील मागणी जोर धरू लागलेली असतानाच या परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा दबाव असल्याचा अजब दावा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे. पालकांना ही परीक्षा हवी असून जेईई परीक्षेसाठी 80 टक्के विद्यार्थ्यांनी अगोदरच  त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी नुकतीच डीडी न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी वरील दावा केला आहे. हा दावा करताना ते म्हणतात की, जेईई आणि नीटसारख्या परीक्षांना परवानगी का देत नाही, असा सवाल अनेक पालकांकडून उपस्थित करण्यात आला होता. विद्यार्थी त्यांच्या भविष्याला घेऊन चिंतेत असल्याने पालकांनी ही मागणी केल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
 गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीला लागले असून ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘जेईईच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेलल्या एकूण 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी 7.25 लाख विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर आहोत. त्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची असून प्रथम त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला, असे त्यांनी यावेळी सांगितले.