Main Featured

दूध उत्पादकांना राज्य सरकार मदत करणार; जयंत पाटील यांची ग्वाही
करोनाच्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने दूध विक्रीवर परिणाम झाला. यातून दुधाचे अर्थकारण कोलमडले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतक-यांना मदत केली जात आहे. दूध संघांकडून दूध खरेदी सुरू असून, दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू आहेत,’ असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. ते रविवारी सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दूध दर आंदोलनांबाबत विचारणा केली असता मंत्री पाटील म्हणाले, ‘शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. शेतक-यांचे प्रश्न निदर्शनास आणून देणे किंवा त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे ही चांगलीच बाब आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची आंदोलनाची भूमिका अयोग्य नाही. करोना संसर्गाने उद्भवलेल्या प्रश्नांमुळे दूध दराचे संकट अधिक वाढले. केंद्र सरकारनेही याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी राज्य सरकारने मागणी केली आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याने दूध उत्पादकांना मदत देणे सुरू केले आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देणा-या दूध संघांची दूध खरेदी सुरू केली आहे. याशिवाय दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू आहेत.’


दरम्यान, भाजपसह मित्र पक्षांनी शनिवारी केलेल्या दूध दरवाढ आंदोलनात दूध रस्त्यावर ओतल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला. बंदी आदेशाचा भंग करून दुधाचे नुकसान केल्याबद्दल इस्लामपूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचा मोठा परिणाम

दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनांसह भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसला.