Main Featured

पवार कुटुंबात All is Not Well...! रोहितनं दिली पहिली प्रतिक्रिया


पवार कुटुंबात All is Not Well...! रोहितनं दिली पहिली प्रतिक्रिया

 महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर सार्वजनिकरित्या केलेल्या आक्रमक टीकेची मोठी चर्चा सुरू आहे. यावर रोहित पवार यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावरून पवार कुटुंबात 'All is Not Well' असं चित्र दिसत आहे. हा आमच्या फॅमिलीचा विषय आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत.
'हा फॅमिली विषय आहे. त्यावर साहेब बोलले आहेत. आपण फॅमिली विषयावर बोलण्यापेक्षा सुशांतला न्याय मिळायला हवा यावर भाजप राजकारण करतं आहे.' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर भाजप राजकारण करत असल्याचं टीका रोहित पवार यांनी केली आहे.
यावेळी, कुटुंबात सुरू असलेल्या वादावर पवार साहेब बोलतील आणि निर्णय घेतील असं म्हणत अधिक माहिती देण्याचं रोहित पवारांनी टाळलं. दरम्यान, पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचं बोललं गेलं. पण हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Must Read
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीत एकत्र भेटणार असल्याची माहिती मिळते आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार आणि या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
खरंतर, विधानसभेच्या वेळीही श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. त्यामुळे यावेळीही पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला तिढा श्रीनिवास पवारच सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.