Main Featured

महाराष्ट्रात जी फसगत झाली तोच प्रकार पायलट यांच्यासोबतIndian Politics

Indian Politics-  राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Must Read


“काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.
Indian Politics
“काँग्रेसने राजस्थानमधील सरकार वाचविण्यात यश मिळवले आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. काँग्रेस हितासाठी आपण यापुढेही काम करत राहू, असे पायलट यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे व मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे सरकार चालविण्यासाठी स्पष्ट बहुमत आहे. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.


सचिन पायलट (sachin Pilot) यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भाजप भेदू शकला नाही. सत्ता व दबावाचे सर्व मार्ग अवलंबून अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या भूमीवर सरकार पाडणाऱ्यांना मात दिली. सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच ‘उपाय’ वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही. 
आता राहिलेले काम दिल्लीत प्रियंका व राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जे घडवता आले ते भाजपला राजस्थानच्या युद्धभूमीवर करता आले नाही. गेहलोत यांच्या तुलनेत पायलट हे कमालीचे कच्चे खेळाडू निघाले. म्हणजे महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी उरकूनही जी फसगत झाली तोच प्रकार सचिन पायलट यांच्याबाबत झाला,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
“पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. “महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱया नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसफसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण? महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता?,” असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
“भाजपवाल्यांना तर झारखंडचे सरकारही पाडायचे आहे, पण त्यांना ते अजून तरी जमलेले नाही. राष्ट्रापुढील सर्व प्रश्न जणू संपले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यात मन रमवण्याचे उद्योग सुरू आहेत. देशावर आर्थिक व बेरोजगारीचे भयंकर संकट कोसळले आहे. त्यावर कोणी ठोसपणे बोलायला तयार नाही. करोनाच्या संकटाने लोकांचे जीवन संकटात आले व मृत्यूचा वेग वाढतो आहे. तेसुद्धा राज्यकर्त्यांच्या खिजगणतीत नाही. उद्योग-व्यवसाय पूर्ण कोलमडून पडला आहे. तो सावरण्याऐवजी हे लोक विरोधकांची सरकारे पाडायला निघाले आहेत. महाराष्ट्र असो की राजस्थान, पश्चिम बंगाल असो की झारखंड, तेथे फालतू बखेडे निर्माण करायचे व अस्थिरता निर्माण करायची हे राजकीय मनोरुग्णतेचे लक्षण नव्हे काय?,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“जणू काही भाजपच्या अमलाखालील राज्य सरकारेच काय ती ठीकठाक सुरू आहेत. खरे म्हणजे सगळ्यात जास्त गोंधळ व अराजक त्यांच्याच राज्यांत आहे. बाजूच्या कर्नाटक राज्यातील स्थिती कोरोनामुळे नियंत्रणाबाहेर गेलीच आहे. गुजरातचेही बरे चाललेले नाही, हरयाणात गोंधळ आहे, मणिपुरात अंतर्कलह सुरूच आहेत. गोव्यात कोरोना शिखरावर पोहोचला आहे. बिहारमध्ये ‘विकास’ हा मुद्दा साफ खड्ड्यात गेल्याने मुंबईतील सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर राजकीय गुजराण सुरू झाली आहे. खरे तर यांच्यापेक्षा विरोधकांची सरकारे उत्तम चालली आहेत, पण त्यांना केंद्राची अजिबात मदत नाही की सहकार्याची भावना नाही. म्हणूनच राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.