Main Featured

...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार


ncp rohit pawar tweet on pm narendra modi sanitary pads announcement | ...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Prime Minister Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात एक रुपयात सॅनिटरी पॅड देण्याबाबतचा उल्लेख केला. रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचं स्वागत केलं आहे. महिला-भगिनींच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानायला हवेत. समाजात जनजागृतीच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट झाली असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वैयक्तिक स्वच्छता व त्यातही महिलांची मासिक पाळीचा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पण आपल्या समाजात अजूनही या विषयावर उघडपणे चर्चा केली जात नाही. विशेषतः ग्रामीण भागामध्ये याबाबत दुर्लक्ष होत असल्याचं दिसतं, परिणामी अनेक महिला-भगिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींना सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर महिलांना 1 रुपयात सॅनिटरी पॅड देण्याचा पंतप्रधानांनी केलेला उल्लेख हा महत्त्वपूर्ण ठरतो" असं रोहित यांनी म्हटलं आहे. 
Must Read 
महिला-भगिनींच्या आरोग्यासाठी सॅनिटरी पॅडचं महत्त्व लक्षात घेता मी ही या क्षेत्रांत बऱ्याच दिवसांपासून काम करतोय. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (बारामती) माध्यमातून बचत गटाच्या महिलांकडून 'सोबती' नावाने सॅनिटरी पॅडस् तयार करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे अडीच लाख मुलींना ते मोफत दिले. त्यासाठी माझ्या आईने (सुनंदाताई) खूप परिश्रम घेतले, हे मी अभिमानाने सांगू शकतो. मुलींना फक्त सॅनिटरी पॅडचं वाटपच केलं नाही तर कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघासह सातारा, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, जालना या भागांतील शाळकरी मुलींपर्यंत पोचून आईने त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांचे गैरसमज, शंका दूर करत त्यांना सॅनिटरी पॅडचं महत्त्व पटवून दिलं."
"महिला पालकांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातही याबाबत जागृती केली. शिवाय हे पॅड बचत गटाच्या महिलांकडूनच बनवून घेण्यात येत असल्याने त्यांनाही रोजगार मिळतो, शिवाय ते पर्यावरण पूरक असल्याने प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होत नाही. पहिल्या टप्प्यात सोबतीचे अडीच लाख पॅड मोफत दिले असून दुसऱ्या टप्प्यात ते ना नफा ना तोटा या तत्त्वावर २० ₹ मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे पंतप्रधानांनी या विषयाला हात घातल्याने महिला-भगिनींच्या आरोग्याबाबत प्रत्येकजण संवेदनशीलतेने विचार करेल आणि त्यामुळं समाज सुदृढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास आहे" असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.