Main Featured

राज्यात 'या' नव्या पक्षाचा उदय; महापालिका निवडणूक लढवणार


आमचं ठरलंय विकास आघाडी


लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलंय 'अशी घोषणा झाली आणि विधानसभा निवडणुकीतही तोच मार्ग राजकीय रणनीती म्हणून वापरला गेला. नंतर हा शब्द राज्यभर चर्चेला आला. तोच शब्द घेत आता 'आमचं ठरलंय विकास आघाडी' या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला असून त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वादात महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मदत न करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. दोघेही एका आघाडीत असतानाही त्यांना मदत न करता शिवसेनेला 'हात ' देताना पाटील यांनी 'आमचं ठरलंय' असं वाक्य वापरत आपली रणनिती जाहीर केली. त्यानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी ऐवजी शिवसेनेला मदत करत प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार होण्यास हातभार लावला.

लोकसभा निवडणूक काळात या शब्दाची फारच चर्चा झाली. नंतर विधानसभेतही हात शब्द केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर चर्चेला आला. या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांचे कार्यकर्ते प्रमोद दिनकर पाटीलयांनी आमचं ठरलंय विकास आघाडी या नावाने एक पक्ष स्थापन केला. त्याच्या नोंदणीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. निवडणूक आयोगाने यावर हरकती मागवल्या होत्या. तीन महिन्यात एकही हरकत न आल्यामुळे अखेर या पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत हा पक्ष सलामी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत खुद्द शरद पवार यांनी देखील या शब्दाची दखल घेतली होती. राजकीय रणनीती म्हणून या शब्दाला या काळात वजन आले. सतेज पाटील यांच्या या शब्दाचा अर्थ कार्यकर्त्यांना पक्का समजला. त्यानुसार कृती केली. पुढे विधानसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय’ म्हणत ऋतुराज पाटील यांनी प्रचार केला. ते आमदार झाले. यामुळे पाटील गटाला हा शब्द अतिशय जवळचा झाला. पुढे राज्यभरात त्याचे अनेक ठिकाणी अनुकरण झाले असले तरी त्याचे पेटंट मात्र कोल्हापूरकडेच राहिले.

कोल्हापुरात अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. अशा वेळी या आघाडीच्या वतीने हा गट निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे ताराराणी आघाडीचा या पद्धतीने अनेक वर्षे वापर करतात. तीच चाल गृहराज्यमंत्री पाटील यापुढे खेळणार असल्याची चर्चा आहे. आगामी गोकुळ दूध संघ व राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्याची झलक दिसण्याची शक्यता आहे.