Main Featured

कर्जाचे हप्ते 31 डिसेंबर पर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी : युवा महाराष्ट्र सेना


इचलकरंजी येथे  कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लागल्यास नागरीकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळं नागरिकांचे सर्व कर्जाचे हप्ते 31 डिसेंबर पर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी इचलकरंजीतील युवा महाराष्ट्र सेनेनं केली आहे. या मागणीसाठी आज कार्यकर्त्यांनी हातात दोरी घेऊन प्रांतकार्यालयासमोर प्रतिकात्मक आत्महत्येचा अनोखा प्रकार करत प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिलं.

लॉकडाऊनमुळं सर्व व्यवहार ठप्प होते आणि अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. अनलॉक सुरू असलं तरी अद्याप उद्योग,व्यवसाय पुर्ण क्षमतेनं सुरू नाही. परिणामी बेरोजगारीही वाढत आहे. उत्पादन अल्प प्रमाणात असल्यानं व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्यांना आणि कामगार वर्गाला काम नसल्यानं कर्जाचे हप्ते भरणंही अशक्य होत आहे.

व्यवसाय पूर्ववत सुरू होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाह चालवणं कठीण झालं असताना कर्जाचा तगादा लागल्यास नागरिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळं सर्व प्रकाराच्या कर्जाचे हप्ते 31 डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी युवा महाराष्ट्र सेनेनं केली आहे. या मागणीसाठी इथल्या प्रांतकार्यालयासमोर हातात दोरी घेऊन प्रतिकात्मक आत्महत्येचा प्रकार करत शिष्टमंडळानं प्रांताधिकार्‍यांना मागणीचं निवेदन दिलं. तसंच महाराष्ट्रात कर्जाच्या हप्त्यासाठी कोणत्याही नागरिकानं आत्महत्या केल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही दिला आहे. शिष्टमंडळात तोसिफ इनामदार, अभिषेक घोडगिरे, राहुल लोकरे, अभिजित कांबळे यांचा समावेश होता.