Main Featured

मुख्याधिकार्‍यांनी केलेल्या बेकायदेशीर वर्तनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी


इचलकरंजी येथे कोरोनाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर काही दिवस होम क्वारंटाईन होणं आवश्यक आहे. तरीही इचलकरंजी नगरपालिकेचे कोरोना बाधीत मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे दुसरा अहवाल येण्यापूर्वीच कामावर रुजु झाले आहेत. अधिकार्‍यांच्या अशा बेजबाबदारपणामुळं संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळं त्यांनी केलेल्या बेकायदेशीर वर्तनाबाबत कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक शशांक बावचकर यांनी जिल्हाधिकार्‍याकडं केली आहे.

कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत असल्यानं इचलकरंजी शहरातील बाधीतांची संख्या दिडहजारहून अधिक झाली आहे. 1 ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळं जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांचा कार्यभार स्विकारला होता. मुख्याधिकारी खांडेकर हे त्यांचा दुसरा अहवाल येण्यापूर्वीच 11 ऑगस्ट रोजी कामावर रुजु झाले आहेत. कामावर रुजु झाल्यावर त्यांचा दुसरा अहवालही पॉजिटीव्ह आला आहे. वस्तुत: शासन नियमानुसार दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यवारही काही दिवस होम क्वारंटाईन होणं आवश्यक आहे. मात्र दुसरा अहवाल येण्यापूर्वीच मुख्याधिकारी कामावर रुजु होणं कितपत योग्य आहे ?

अधिकार्‍यांच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळं संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता बळावली आहे. त्यांचा कार्यालयीन शिपाई सादीक किल्लेदार याचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून त्यांचे स्विय्य सहाय्यक आणि त्यांचे कुटुंबियांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ज्यांनी योग्य निर्णय घेऊन शहर नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे त्यांनीच असं वर्तन केलं तर अधिकारी, नागरीकांना डोस पाजण्याचा नैतिक अधिकार उरेल काय ? असा सवाल उपस्थित करून बावचकर यांनी मुख्याधिकार्‍यांनी केलेल्या बेकायदेशीर वर्तनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडं निवेदनाद्वारे केली आहे.