Main Featured

राज्यातील जिम सुरू होणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं 'हे' विधान



uddhav-thackeray

राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील जिम चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी जिम सुरु करताना करोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील जिम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचे संकेत दिले होते. माझ्या आकलनानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिम सुरू होण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगत मात्र, जिम सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतली असंही राऊत म्हणाले होते. त्यामुळे आज जिमचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने मंगळवारनंतर जिम सुरू करण्याबाबतची नोटिफिकेशन्स राज्य सरकार काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.