Main Featured

गणेशोत्सव कसा साजरा करायचा? मंडळांनी केली ही मागणी


pune ganesh festival : गणेशोत्सव कसा साजरा करायचा? पुण्यातील मंडळांनी केली ही मागणी
गणेशोत्सव Ganeshotsav साधेपणाने साजरा करायचा असला तरी छोटा मांडव गरजेचा आहे. अनेक मंडळांची कायमस्वरूपी मंदिरे नाहीत. त्यांनी गणेशोत्सव कसा साजरा करायचा ? काही मंडळांची मंदिरे लहान असल्याने सुरक्षित वावराचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. यामुळे छोटा मांडव थाटण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांनी गुरुवारी केली.

पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने शुक्रवार पेठेतील लाड सुवर्णकार धर्मशाळेत झालेल्या बैठकीत गणेश मंडळांनी ही मागणी केली. सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील, फरासखाना पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, भरत मित्र मंडळाचे प्रमुख बाळासाहेब दाभेकर, भाऊ करपे, दत्ता सागरे तसेच साठ- सत्तर मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी तो मंदिरात करणे शक्य नाही. मंदिरांमध्ये एक मूर्ती असताना आणखी एका मूर्तीची प्रतिष्ठापना करणे योग्य नाही. सजावट नसेल तसेच अभिषेक, पूजा, आरती असे धार्मिक विधी भाविकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने पाहता येतील. उत्सव मंदिरात केला तर बंदिस्त जागेत गर्दी होण्याचा धोका आहे. उत्सव बंदिस्त जागेऐवजी खुल्या जागेत करणे सुरक्षित आहे, अशी भूमिका मंडळांनी मांडल्याचे खडकमाळ आळी मंडळाचे ऋषीकेश बालगुडे यांनी सांगितले. गणेश पेठ पांगुळआळी सार्वजनिक गणपती ट्रस्टने गणेशोत्सवाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याचे जाहीर केले.

'शहरातील बहुतेक मंडळांची कायमस्वरुपी मंदिरे आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी स्वतंत्र मांडव न थाटता मंदिरातच गणपतीची प्रतिष्ठापना करावी. छोटे मंदिर असले तरी त्याच ठिकाणी उत्सव साजरा करावा,' अशी भूमिका पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मध्यंतरी मांडल्यानंतर काही मंडळांनी याप्रकारे उत्सव साजरा करण्यास होकार दर्शवला असला तरी अनेक मंडळांनी छोट्या मांडवाचा आग्रह कायम ठेवला आहे.