पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज चर्चा केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या चर्चेत सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय व्हावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींकडे केली.

Must Read

“विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये. त्यामुळे अव्यावसायिक कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावं. करोनामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार. यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
“वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर करोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल,” असंही उद्धव ठाकरे यांना सुचवलं. राज्यात करोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच या सुविधांसाठी डॉक्टर, नर्से, कर्मचारी यांची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) सांगितलं.
करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्याने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. उद्धव ठाकरेंसोबत इतर नऊ राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते.