Main Featured

पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांवर भाजपचा विश्वास; दिली मोठी जबाबदारी


गोपीचंद पडळकर


मागील विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देणारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपनं मोठी जबाबदारी दिली आहे. पडळकर यांची भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय दहा प्रवक्ते व ३३ चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे. सर्व प्रवक्त्यांना विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार पडळकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी असेल. माजी खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा त्यांच्या बरोबरीनं पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांवर भाजपसाठी किल्ला लढवतील.

Must Read 

विधानसभा निवडणुकीच्या आधी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. बारामती मतदारसंघातून त्यांनी अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळं ते चर्चेत आले होते. मात्र, तिथं त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर अनेक दिग्गजांना डावलून त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडेच शरद पवार यांच्यावर अपमानकारक टीका केल्यामुळं ते वादात अडकले होते. 'पवार हे महाराष्ट्राला झालेले करोना आहेत' असं ते म्हणाले होते. भाजपनं त्यावेळी त्यांच्या वक्तव्यापासून हात झटकले होते. मात्र, नवी जबाबदारी देत पक्षानं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.