Main Featured

रमाई आवास घरकुल योजनेच्या ठिकाणी चक्क मैल खड्ड्यातील कचरा
इचलकरंजी येथे साईट नं. 102 परिसरातील रमाई आवास घरकुल योजनेच्या ठिकाणी मुरुमाचा भराव टाकण्याऐवजी चक्क मैल खड्ड्यातील कचरा आणून टाकला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेकडे विचारणा करता त्यांनाही धक्का बसला. अधिकार्‍यांनी माहिती घेतली असता हे काम कोणी सांगितले तेच समजू शकले नाही. त्यामुळे हा नेमका प्रकार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

सात वर्षापूर्वी म्हणजेच सन 2014 मध्ये इचलकरंजी नगरपरिषदेच्या माध्यमातून साईट नं. 102 येथे रमाई आवास घरकुल योजनेची पायाभरणी करण्यात आली. पण आजतागायत अर्धवट सांगड्याशिवाय ही योजना रखडली आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतरही ही योजना अद्याप अपूर्ण आहे. आंदोलन छेडल्यानंतर केवळ फार्स केला जातो. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या...प्रमाणे योजना तशीच राहते. या योजनेत 181 लाभार्थी असून मागील सात वर्षापासून ते घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत.

योजनेचे काम रखडले असतानाच दोन दिवसापूर्वी अर्धवट बांधकाम असलेल्या ठिकाणी मुरुमाचा भराव टाकण्याऐवजी चक्क मैल खड्ड्यातील कचराच आणून टाकण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रमाई आवास घरकुल लाभार्थी संघटनेचे सुखदेव माळकरी व पदाधिकार्‍यांनी त्याठिकाणी जावून संबंधित डंपर चालकांकडे चौकशी केली. पण त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मुख्याधिकारी, नगरअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही धक्का बसला. असे कोणतेच काम सांगितले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच अधिकार्‍यांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नेमकी माहिती मिळूच शकली नाही.

आधीच पावसाळ्याचे दिवस सुरु असून याठिकाणी कचरा आणून टाकल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा प्रकार नेमका कोणाच्या सांगण्यावरुन झाला याचाही तपास करण्याची मागणी होत आहे.