Main Featured

इचलकरंजीत घडले माणूसकीचे दर्शन


इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत दहन करण्यात आलेल्या मृतदेहांचे विधीवत रक्षाविसर्जनसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत माणूसकीचे दर्शन घडविले. जवळपास 13 मृतदेहांचे रक्षाविर्सजन करण्यात आले. सध्या इचलकरंजी शहर व परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. जवळपास साडेपाचशेपेक्षा अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली असून उपचारादरम्यान आजवर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहावर कोविडचे नियम पाळून अंत्यसंस्कार केले जातात. त्यानुसार येथील पंचगंगा स्मशानभूमीत प्रशासनाकडून नियमानुसार अनेक मृतदेहांवर विधीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु त्यानंतर तीन दिवसांनी होणारा रक्षाविसर्जनाचा विधी मात्र रखडला गेला होता. रक्षा विसर्जन संदर्भात नगरपरिषदेच्यावतीने आवाहन करण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे मृत्यू झालेल्याचे नातेवाईकसुध्दा क्वारंटाईन असल्याने रक्षाविसर्जनाचा विधी करण्यात अडचणी येत होत्या. कोरोनासह विविध कारणांनी मृत्यू झालेल्या मृत व्यक्तीचे दहनविधी झाले होते. तर रक्षाविसर्जन झाले नसल्याने अन्य मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत होत्या. ही अडचण ओळखून उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले, आर्य चाणक्य संस्थेचे जवाहर छाबडा, नंदकिशोर भुतडा यांनी पुढाकार घेऊन आपल्याच घरातील व्यक्ती समजून जवळपास 13 व्यक्तींचे रक्षाविसर्जनाचे विधी केले. तसेच स्मशानभूमीतील जागेची स्वच्छताही केली. या कामात सामाजिक कार्यकर्ते अनिस म्हालदार, प्रा. युवराज मोहिते, निहाल बागवान, दत्ता डंबाळ यांचेसह नगरपरिषदेचे कर्मचारी अमर लाखे, रामा आवळे व अमृतमामा भोसले युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.