Main Featured

...तर 27 जुलै पासून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच बेमुदत आंदोलन छेडणार : आम. प्रकाश आवाडेआयजीएम कडील त्या 42 जणांना कोविड युध्दात सहभागी करुन घेण्यासंदर्भात रविवारपर्यंत शासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास सोमवार (27 जुलै) पासून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकी बोलताना दिला. या प्रश्‍नी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या 42 जणांना सेवेत घेण्याचे आदेश दिल्यानंतरही रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, पूर्वीच्या आयजीएम कडील 3 वैद्यकीय अधिकारी, 32 स्टाफ नर्स, 2 फार्मासिस्ट, 2 एक्स-रे टेक्निशियन, 2 लॅब टेक्निशियन, 1 फिजीओथेरिपिस्ट अशा 42 जणांना शासनाच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात समावेशन करण्याचा प्रश्‍न प्रलंबित आहे. परंतु सध्या सगळीकडेच थैमान घातलेल्या कोरोना महासंकटाच्या पार्श्‍वभूमीवर हे 42 जण विनामोबदला आरोग्यसेवा देण्यास म्हणजेच कोविड योध्दे होण्यास तयार आहेत. त्यांना सेवेत रुजू करुन घ्यावे यासाठी आपण पाठपुरावा सुरु केला. त्याला यश मिळून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी त्या 42 जणांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोविड काळात सेवेत घेण्यासंदर्भात लेखी आदेशही दिले. परंतु त्यानंतरही रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षकांनी नाकर्तेपणाची भूमिका घेत त्यांना सेवेत घेण्यास नकार दर्शविला. महामारी संकटाच्या काळात रुग्णालयात मनमानी कारभार असून जागा उपलब्ध असतानाही रुग्णांना माघारी पाठवून सेवा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दोन अतिदक्षता विभाग आणि 30 स्पेशल रुममध्ये सुविधा असून त्या वापरात घेण्याच्या सूचना करुनही रुग्णालय त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वैद्यकिय अधिक्षक शेट्ये यांची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे. तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट लॅब उपलब्ध असताना त्याठिकाणी केवळ मोजक्याच टेस्ट करुन अनेक नागरिकांना नाहकपणे माघारी पाठविले जात असल्याची जाणीव करुन दिली.

जवळपास 20 वर्षापासून सेवारत असलेले 42 जण कोविड रुग्णांच्या सेवेसाठी विनामोबदला रुजू होण्यास तयार आहेत. परंतु त्यांना का घेतले जात नाही हे अनुत्तरीत आहे. या संदर्भात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता त्यांनीही त्या 42 जणांना सेवेत घेण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. पण त्यांनीही तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपण विनामोबदला सेवा देण्यास तयार असल्याचे निवेदनही जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. पण जिल्हा शल्यचिकित्स तांत्रिक मुद्यावर अडून राहिले. त्यामुळे थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून त्यांना येथील परिस्थितीची विस्तृत माहिती दिली. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक केम्पीपाटील यांना त्या 42 जणांना सेवेत घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरही जिल्हा शल्यचिकित्सकांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन चांगल्या सुविधा आणि आरोग्यसेवक स्वत:हून सेवा देण्यास पुढे येत असताना कोरोनाच्या संकटात शहरवासियांना चांगल्या मिळू नयेत असाच प्रयत्न रुग्णलयात सुरु असल्याचा आरोप केला. त्यामुळे रुग्णालयातील पदाधिकार्‍यांच्या नाकर्तेपणाच्या विरोधात आणि शासनाने त्या 42 जणांबाबत रविवारपर्यंत निर्णय न दिल्यास 27 जुलैपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा आमदार आवाडे यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते उपस्थित होते.